0

समोरची व्यक्ती मूर्ख नाही !


मला माझ्या मित्रांसोबत चर्चात्मक वादविवाद घालायला आवडतो. या विवादाचे नियम सोपे आहेत. चर्चेत एकमेकांना प्रत्युत्तर देता येणार नाही. फक्त समोरचा माणूस असा विचार का करतो हे विचारता येईल आणि चर्चेतील विषयांवर नंतर बोलायचे नाही. (हो ! नंतर उगीच भांडण नको.)  'बॉन्डपट फालतू असतात' किंवा 'सचिनला उगीचच देव मानतात' पासून 'नरेंद मोदी आत्तापर्यंतचे सर्वोत्तम पंतप्रधान आहेत' अश्या कोणत्याही विषयावर वाद घालता येतो. या चर्चेत एखादा माणूस जेंव्हा 'अरे, तू असा विचार करतोस असे मला वाटले नव्हते' असे म्हणतॊ तेंव्हा बहुतेक वेळा त्याला 'मला तू आमच्यातला वाटत होतास' असे म्हणायचे असते.

'प्रत्येकजण आपल्यासारखा विचार करतो' या पूर्वाग्रहाला मानसशात्रात 'खोट्या एकमताचा पूर्वाग्रह' (false-consensus bias) असे म्हणतात. हा समज बरेचदा दूरचित्रवाणीवरील मालिका बघताना (या असल्या सासू-सुनेच्या मालिका कोण बघतो ?) आणि राजकारणात ( या असल्या नेत्यांना मते कशी मिळतात ?) प्रकर्षाने दिसून येतो. सोशल मीडियावर तर हा गैरसमज वेगाने आणि मोठया प्रमाणात पसरतो. आपल्या समविचारी मित्रांची मते वाचून आपल्याला वाटू लागते कि फक्त आपणच तर्कशुद्ध  विचार करतो आणि बाकी सगळे लोक मूर्ख आहेत ज्यांना एवढ्या साध्या गोष्टीसुद्धा समजत नाहीत. हा संकुचित विचार फारच घातक आहे आणि सोशल मीडियाचा विधायक वापर करायचा असेल तर हा गैरसमज आधी सोडून द्यायला पाहिजे. या गैरसमजामुळे सगळीकडे फक्त स्वतःचा प्रतिध्वनी ऐकू येतो आणि एखाद्या घटनेवर कोणी विरोधी मते मांडली तर आपल्याला धक्का बसतो. इंटरनेटमुळे सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय मतांमधील फरक हळूहळू संपत जातो. 'माझी आणि माझ्या मित्राच्या मालिकांची आवड सारखी आहे' वरून आपली विचारसरणी कालांतराने 'अमुक मालिका आवडत असेल तरच हा माझा मित्र ! ' अशी बनते.समोरची व्यक्ती आपल्या विचारसरणीची नसेल तर बहुदा आपली पहिली प्रतिक्रिया समोरच्याला मूर्ख समजण्याची असते. अर्थातच या जगात द्वेष आणि हिंसा पसरवणारे काही थोडे लोक आहेत पण मी अश्या बहुसंख्य लोकांविषयी बोलतोय ज्यांची एकाद्या विषयावर आपल्यापेक्षा वेगळी आणि प्रांजळ मते असतात आणि त्यामागची विचारसरणी सुध्दा तुमच्यासारखीच तार्किक असते. हा राजकीय अचूकतेचा प्रश्न नाही. आपल्यापेक्षा वेगळ्या विचारांची व्यक्ती बरोबर असू शकतो हि शक्यताच आपण नाकारतो. दुसऱ्यांच्या विचारांबद्दल कुतूहल दाखवण्यापेक्षा मग आपण फक्त आपल्याशी जुळणारे विचार वाचून स्वतःची पाठ थोपटून घेतो. फक्त आपल्या विचारसरणीचे लेख पुढे पाठवून आपण जास्त ज्ञानी बनत नाही तर उलट कुपमंडक वृत्तीचे बनतो. वेगळा विचार करण्याची क्षमता घालवून आपण झुंडीत सहभागी होतो. सोशल मीडियावर स्वतःची एक प्रतिमा बनवून ती टिकवून ठेवण्यासाठी खऱ्या गोष्टींपेक्षा प्रसंगी खोट्या बातम्या फॉरवर्ड करतो.

यावर उपाय म्हणजे सोशल मीडियामध्ये बनवलेली स्वतःची प्रतिमा छेदून आपल्या विरुद्ध मताच्या लोकांसोबत संवाद साधायला शिकले पाहिजे. समोरच्या व्यक्तीला मूर्ख न समजता त्याची विचारसरणी जाणून घेतली पाहिजे. प्रत्येक वेळी 'आपण चुकीचे असू शकतो' अश्या खुल्या विचाराने संवाद केला पाहिजे. सोशल मीडियावर सर्वत्र लीलया वावरणारे  तुम्ही कधी कधी चुकीचे पण असू शकता ना ? तुमच्यापेक्षा वेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या, वेगळ्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीत जगणाऱ्या लोकांचे विचार वेगळे असू शकतात. कदाचित तुम्हाला सगळ्या गोष्टी माहितपण नसतील. सोशल मीडियावरील वाद बघा. राहुल गांधींना पाठिंबा देणारे लोक तुम्हाला मूर्ख वाटतात का ? त्यांच्या वागण्यामागे काहीतरी वैचारिक कारण असू शकेल. ते कारण समजून घेतल्यावरच आपण त्यांच्याशी चर्चा करू शकतो. दुसऱ्यावर चिखलफेक करून आपण आनंद मिळवू शकतो पण दुसऱ्यांचे विचार समजून घेतल्याशिवाय आपण प्रगती करू शकत नाही. त्यांची बाजू ऐकून घेतल्याशिवाय तुम्ही त्यांना तुमची बाजू समजावू शकत नाही.

पुढच्या वेळी सोशल मीडियावर भांडताना एक गोष्ट करून बघा: समोरच्याला तुमची बाजू पटवण्याऐवजी त्याची बाजू ऐकून त्याच्या मतातील कच्चे दुवे हेरून फक्त त्याला प्रश्न विचारा. सोशल मीडियावर काहीही टाकण्यापूर्वी मी हे का पोस्ट करतोय याचा विचार करा. तुम्ही विचार न केलेली एखादी गोष्ट तुम्हाला कळली का फक्त तुमच्या आवडीची गोष्ट फॉरवर्ड करून तुम्हाला लाईक्स मिळवायचे आहेत ? समोरच्या व्यक्तीला मूर्ख म्हणून झटकून टाकण्यापेक्षा 'कदाचित हा बरोबर असेल. काय म्हणतोय ते तरी बघु'  असे म्हणून खुल्या दिलाने विचार करा.


The 'Other Side' is not dumb या लेखाचे स्वैर भाषांतर.
0

Random Thoughts - 13

पुण्यात गाडी चालवणे म्हणजे पोकर खेळण्यासारखे आहे. जसे बॉंण्ड म्हणतो त्याप्रमाणे "In poker you never play your hand. You play the man across from you."  तशी, तुमची गाडी कोणती आहे किंवा तुम्ही कशी चालवत आहात यापेक्षा समोरच्या माणसाचीच चूक आहे असा निगरगट्ट चेहरा करून  चालवता आली पाहिजे. तुमचे पत्ते फारच भारी असतील तर तुम्ही निश्चिंत असता. नाहीतर दोन्ही बाजू bluff करत राहतात आणि शेवटी show time आल्यावर एकजण माघार  घेतो.

पुण्यात गाडी चालवताना तुम्ही एकतर शिव्या खाता अथवा शिव्या देता. दोन्ही न करणारे लोक फारच दुर्मिळ आहेत.

पुण्यात रस्त्याच्या कडेला किंवा दुभाजकावर झाडे कशाला लावतात याचे उत्तर अखेर मला मिळाले. दररोज कुठेनाकुठे तरी पी. एम. टी. च्या बसेस बंद पडलेल्या दिसतात (पुणे बस डे झाल्यापासून सकाळमध्ये बंद पडलेल्या बसेसचे फोटो येत नसले तरी !). आणि बस बंद पडली कि बसच्या मागे, बाजूला झाडाच्या फांद्या तोडून लावतात. यामागे काही आयुर्वेदिक कारण आहे का ते माहित नाही पण रोज बस मध्ये अश्या फांद्या घेवून फिरण्यापेक्षा जिथे बस बंद पडेल तिकडे ताज्या फांद्या मिळण्यासाठी अशी झाडे लावत असावेत असे माझे मत झाले आहे.

''येथे लग्न, पार्टीच्या ऑर्डर्स स्वीकारल्या जातील'  असे लिहिलेल्या गाड्यांवर कोणी पार्टीच्या ऑर्डर देतात का ? केशकर्तनालयात जी जपानी(का कोरिअन ?) तरुणांच्या हेअरस्टाइल चे फोटो लावले असतात तशी हेअरस्टाइल कोणी करतं का ? का दुकानच्या सर्टिफ़िकेट सारखे हे पोस्टर लावणे सुद्धा त्यांना बंधनकारक असते ?

dandruff हटवण्याच्या एवढ्या जाहिराती पाहिल्यावर dandruff घालवण्यापेक्षा टक्कल करून परत केस उगवणे सोपे आहे असे लागले आहे. आणि काळे कपडे घालणे  महत्वाचे असेल तर dandruff तात्पुरता काळा करण्याचे एखादे औषध का तयार करत नाहीत ?

आईला जसे आपल्या मुलाचे रडणे ओळखता येते तसे लोकांना आपल्या मोबाइलचा रिंगटोन ओळखता येतो.
1

सचिन खरोखरच देव झालाय का ?


१) अस्तिक आणि नास्तिकांमध्ये जसे देव आहे कि नाही यावरून भांडण चालू असते, त्याप्रमाणे सचिन देव आहे कि नाही यावरून नेहमी भांडण चालू असते.

२) देवाप्रमाणेच सचिनवर टीका केलेली लोकांना (सचिन भक्तांना) आवडत नाही. त्याच्या प्रत्येक कृतीचे समर्थन करणारे लेख येतात.
.
३) देवाप्रमाणे हल्ली त्यालाही सोन्या - चांदीच्या वस्तू भेट देण्यात येत आहेत.

४) सामान्य माणसाला मिळालेली भेट तो सहसा सर्वांसमोर विकत नाही. पण देवाला अर्पण केलेल्या गोष्टी(नारळ, साड्या ई. ) ज्या प्रमाणे जाहीररीत्या विकल्या जातात तशीच सचिनची फेरारी सुद्धा विकली गेली.

५) "सचिन जर देव असेल तर तो प्रत्येक सामन्यात चांगला का खेळत नाही ?"
     "जगात जर देव असेल तर तो प्रत्येकाला नेहमी सुखी का ठेवत नाही ?"

६) जगात देवाच्या असण्या/नसण्यावरून एवढे वाद झाले असले तर स्वत: देव येवून काही बोलत नाही तसेच सचिनसुद्धा तो देव आहे की नाही याबद्दल एकही शब्द बोलत नाही.

---------------------------------------------------------------------------------------------------

ब्लॉग परत चालू करण्याच्या दृष्टीने हा काही फारसा चांगला लेख नाही. पण Drafts मध्ये उगीच साठवलेले जुने लेख प्रकाशित करण्याचा विचार आहे.  माझा एक मित्र म्हणतो त्याप्रमाणे, "तुका म्हणे, 'something is better than अजिबात nothing' ".
9

फोटोग्राफी - एक छंद


रोगांच्या जश्या साथी असतात तशाच छंदांच्या सुद्धा साथी असतात. स्थळ-काळानुसार या वेगवेगळ्या छंदांच्या साथी पसरलेल्या दिसून येतात. सध्याच्या काळात फोटोग्राफीच्या साथीचा सुळसुळात झालेला दिसतो.

साधारणपणे  "नवीन SLR कॅमेरा घेतला" असा निरुपद्रवी वाटणारा फेसबुक अपडेट दिसला कि मला पुढली चिन्हे दिसू लागतात. मग थोड्याच दिवसांत "<नाव आडनाव> Photography " किंवा "<टोपणनाव> Photography" असल्या नावाचे फेसबुक पेज तयार होते. आणि आपल्याला ते पेज लाईक करायला सांगितले जाते. हळू हळू अपडेट्सची संख्या वाढू लागते. सुरुवातीला फोटोग्राफीचे मुलभूत माहिती देणारी वेबपेजेस, बाकी फोटोग्राफर्सचे फोटो, फोटोग्राफीच्या कोर्सेसची माहिती आणि असे बरेच काही शेअर केले जाते.

कॅमेरा हातात आल्यावर लोकांना नवा दृष्टीकोन येतो. म्हातारी माणसे , लहान मुले, गावाकडचा मातीचा रस्ता, डोंगर, शेते या मध्ये नवे सौदर्य दिसू लागते. आता प्रत्येक गोष्ट लेन्स मागून कशी दिसेल याचा विचार केला जातो. त्यांच्या बोलण्यात आता सारखे १८-२५-५०-८० असले काही तरी लेन्स चे प्रकार, फोटोग्राफी मधल्या टर्म्स येवू लागतात.

अश्या वेगवेगळ्या objects चे (का subjects चे ?) फोटो काढून "Random clicks" किंवा "world through my lenses " असल्या नावाच्या अल्बम मधले टाकले जातात. फोटो नुसते काढून भागत नाही. photoshop मधली सगळी फीचर्स आपल्याला वापरतात येतात हे लोकांना कळण्यासाठी फोटोवर नको तेवढे इफेक्ट्स लावले जातात. "खरे चित्र कसे असेल ओळखा ?" असली स्पर्धा या लोकांमध्ये भरवायला काही हरकत नाही. एकाच ठिकाणी फोटो असला तर ठीक, नाहीतर डझनभर साईट्स, instagram व इतर ठिकाणी एकाच फोटो अपलोड करून त्याच्या लिंक्स सगळीकडे शेअर केल्या जातात.

काही लोक ज्याप्रमाणे FourSquare वर check-in करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातात त्याप्रमाणे काही फोटोग्राफर्स "मी या ठिकाणी जाऊन फोटो काढले" असे दाखवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फोटो काढतात. गणपती, दिवाळी असे काही सण, महत्वाच्या स्पर्धा, सवाई सारखे कार्यक्रम झाल्यावर सगळीकडे एकाच प्रकारच्या फोटोंचा खच पडलेला दिसतो.

तर हे छंदी लोक आणि साधे लोक यात फरक काय ? जर एखादा फोटो खराब आला तर यांना technical terms मध्ये तो का खराब आलाय हे सांगता येते आणि सध्या लोकांना "फोटो गंडलाय" एवढेच सांगता येते.
7

तू-तू-मैं-मैं

मी - आई, काय हे ? मला ऑफिसमधून आल्या-आल्या तुझ्या सासू-सुनेच्या रडक्या मालिका बघाव्या लागतात.
आई - पण तू कुठे या मालिका बघतोस ? तू आल्या आल्या लगेच तुझ्या खोलीत जाऊन कॉम्पुटरवर तुझ्या मालिका बघत बसतोस.
मी- या रटाळ मालिकांपेक्षा माझ्या मालिका कधीही चांगल्या आहेत.
आई -मी पण असेच म्हणू शकते.
मी - आता मात्र हद्द झाली. उगीच काहीही बोलू नको.
आई - का ? तुझ्या मालिका का चांगल्या ? त्या इंग्लिश आहेत म्हणून ?
मी - भाषेचा काय संबंध ? काय या तुझ्या मालिकांच्या कथा ? बायका नुसत्या नटून थटून कट-कारस्थान करत असतात आणि पुरुष बाहेर लफडी करत असतात. घडते का कधी असले कोणाच्या आयुष्यात ?
आई - असे घडत नाही ते मलाही माहिती आहे रे. ते LOST मधले बेट, ते तुरुंग फोडणारे, तुरुंगातून ४० वर्षांनी परत प्रकट होणारे कैदी यातल्या कोणत्या गोष्टी घडतात रे मग ? आणि तसेही माझ्या मालिकांच्या सुरुवातीला "सर्व पात्रे व कथानक काल्पनिक आहे" असल्या आशयाची सूचना दाखवतात. तुझ्या मालिकांमध्ये दाखवतात का अशी सूचना कि ते पण आपणच समजून घायचे.
मी - काही मालिका fiction आहेत. पण चांगल्याही आहेत कि बऱ्याच.
आई - इकडे पण चांगल्या आहेत कि काही, एका लग्नाची दुसरी गोष्ट, तारक मेहता आणि इतर काही. तिकडे मालिका जास्त असतील त्यामुळे त्यातल्या चांगल्या मालिकांची संख्या जास्त असेल कदाचित. इकडे मालिका कमी असल्यामुळे त्यातल्या त्यात चांगल्या असलेल्यांची संख्या कमी आहे. पण ratio साधारण सारखाच असणार.
मी- असेल. पण त्या आठवड्यातून एकदा असतात. आणि मध्ये मध्ये ३-४ महिने बंद असतात.
आई - असतील. पण तू दररोज एवढ्या मालिका डाउनलोड करतोस कि २-३ तास तरी जातातच त्यात. आणि मालिका बंद असतील तेंव्हा तू गप्प बसतोस का ? नवीन मालिका बघायला चालू करतोस लगेच. आणि तू ह्या सगळ्या मालिका फुकट
डाउनलोड करतोस. मी केबलचे पैसे देऊन बघते.
मी - त्याचा काय संबंध ?
आई - काही नाही. सांगतेय फक्त की तू पायरसी करतोस आणि मी नाही. मी मालिका बघत असले तरी तुला जेवायला द्यायला एकदातरी उशीर झालाय का ? मी तुला काम सांगितले की तू मात्र मालिका बघत असल्याचे सांगतोस.
मी - करतो ना पण मी काम जरा वेळाने तरी. तू आधी मालिका करत बघतेस नि दुसरया दिवशी शेजारच्या काकुंसोबत प्रत्यक्ष किंवा फोनवर त्याबद्दल चर्चा करत बसतेस.
आई - मग काय झाले ? आम्ही दोघीच तर बोलतो. तुम्ही तर फेसबुक, twiiter , buzz अश्या सगळ्या ठिकाणी आख्या गावासमोर चर्चा करत बसता. आमच्या दोघींच्या चर्चेपेक्षा ते चांगले कसे ?
मी - फेसबुक, twitter बद्दल काही बोलू नको. तूसुद्धा आता फेसबुकवर आली आहेस की.
आई - हो. पण मी तिकडे मालिकांच्या चर्चा करत नाही.  कुठे काय बोलायचे ते मला चांगले माहित आहे.
मी - आता उगीच त्यावर बोलणे चालू करू नकोस. सकाळ मध्ये सोशल नेटवर्किंगवर लेख आलाय का आज ? उगीच काहीतरी छापत असतात ते.
आम्हाला फुकटचा वैताग !
आई - आता तू विषय बदलू नकोस. तू माझ्या मालिकांना नावे ठेवतोस. मी तुझ्या मालिकांना  ठेवते. तू पाहिजे तर मला समाजातील अश्या हिंदी, मराठी चांगल्या, जुन्या मालिका डाउनलोड करून दे. मी त्या बघीन. बोल, आहेस तयार ?
मी - बघतो. जुन्या हिंदी मालिका नेटवर पण फारश्या नाहीयेत. त्यापेक्षा मी माझ्या मालिका बघतो. तू तुझ्या बघ.

--
मी रोज घरी येतो. घरी कुठलीतरी मराठी मालिका चालू असते. मी वरचे संभाषण imagine करतो. मग शांतपणे खोलीत जाऊन मालिका बघणे चालू करतो. कदाचित यापेक्षा वेगळे संभाषण होईलही पण मी तेवढी रिस्क घेत नाही.
0

कुठे जातो तुमचा आयकर ? - ४

आकाश टॅबलेट विकत घेण्यात


मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी वाजत गाजत आकाश टॅबलेटचे उद्घाटन केले. खुल्या बाजारात याची किंमत २५०० रु. असून सरकार सुरुवातीला १,००,०० टॅबलेट्स विकत घेवून विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात १७५० रुपयांना देणार आहे.(अजून पुढे किती टॅबलेट्स घेणार ते नक्की नाही.) साहजिकच यासाठी लागणारा आर्थिक भार सर्वसामान्यांच्या माथी पडणार आहे. आकाश टॅबलेटचे reviews अतिशय वाईट आहेत. त्यातील काही मुख्य दुर्गुण म्हणजे -
१) कालबाह्य resistive touch तंत्रज्ञान (जे फोनसोबत एक वेळ ठीक आहे पण टॅबलेटसोबत म्हणजे फारच वाईट आहे.)
२) अतिशय कमी प्रोसेसिंग पॉवर (
366 Mhz)
३) ३ तासांपेक्षा कमी चालणारी battery.
४) फक्त wi-fi ने जोडले जाणारे इंटरनेट
५) Android App Market मधून apps install न करता येणे.
६)
टॅबलेट जरा वेळ वापरल्यावर गरम होणे.
याशिवाय वाईट touch response, USB कनेक्ट न होणे, hang होणे असे सुद्धा बरेच दुर्गुण आहेत. 

अश्या
टॅबलेटचा वापर करून नक्की कोणत्या विद्यार्थ्यांचा नक्की कसा फायदा होईल हेसुद्धा सरकारने स्पष्ट केले तर चांगले होईल. आपल्या इथे प्राथमिक शिक्षणाची अवस्था आधीच वाईट आहे. (पटपडताळणी मोहिमेचे पुढे काय झाले ते कोणालाच माहित नाही). बऱ्याचश्या खेड्यात पुरेसा वीजपुरवठा नाही, वाय-फाय तर दूरचीच गोष्ट आहे. असे असताना हा सरकारी पॅड बनवायची काही गरज नव्हती. नुसता पॅड देवूनसुद्धा काही उपयोग नाही, सोबत पुस्तकांचे ओझे आहेच. पॅडबरोबर पुस्तके डिजिटल format मध्ये रुपांतरीत करण्याच्या दृष्टीने काहीतरी प्रयत्न केले असते तर ठीक होते. पण तसेही काही दिसत नाही. त्यामुळे गाजावाजा करून केलेला हा प्रयत्न फसण्याचीच चिन्हे आहेत.

जाता जाता,  टॅबलेट ऑर्डर केलेल्या लोकांना टॅबलेट कधी मिळणार हासुद्धा एक कुतूहलाचा विषय आहे. एका बातमीनुसार, १४ लाखांपेक्षा अधिक टॅबलेटची नोंदणी झाली असून कंपनीच्या हैद्राबाद येथील कारखान्याची उत्पादन क्षमता सध्या महिन्याला फक्त २००० टॅबलेट्स एवढीच आहे. एप्रिल पर्यंत नवीन कारखाने काढून दिवसाला ७०,०००-७५,००० टॅबलेट्सचा पुरवठा होईल असा फक्त अंदाज आहे.


3

window shopping

ट्रेकिंग करताना किल्ल्यांतून फिरताना जुन्या काळातील window shopping बद्दल मनात आलेला एक विचार -

कदाचित जुन्या काळीही राजघराण्यातील लोक window shopping करत असतील. कदाचित ते जरा वेगळ्या प्रकारचे असेल. ते सध्यासारखे नसेल तर खरोखरचे शॉपिंग असेल. राजघराण्यातील राण्या किल्ल्याच्या खिडकीत बसून "तो दूरवर दिसणारा किल्ला आपल्याकडे हवा" किंवा "त्या शेतात फार आंब्याची झाडे दिसत आहेत. तिकडे आंबे आण जरा" असे म्हणत असतील का ? आणि जर एखादा "शौकीन" राजा असेल तर "ती नदीकाठी कोण नवीन मुलगी दिसते आहे रे ? जरा चौकशी करा" असे म्हणत असेल का ?