0

समोरची व्यक्ती मूर्ख नाही !


मला माझ्या मित्रांसोबत चर्चात्मक वादविवाद घालायला आवडतो. या विवादाचे नियम सोपे आहेत. चर्चेत एकमेकांना प्रत्युत्तर देता येणार नाही. फक्त समोरचा माणूस असा विचार का करतो हे विचारता येईल आणि चर्चेतील विषयांवर नंतर बोलायचे नाही. (हो ! नंतर उगीच भांडण नको.)  'बॉन्डपट फालतू असतात' किंवा 'सचिनला उगीचच देव मानतात' पासून 'नरेंद मोदी आत्तापर्यंतचे सर्वोत्तम पंतप्रधान आहेत' अश्या कोणत्याही विषयावर वाद घालता येतो. या चर्चेत एखादा माणूस जेंव्हा 'अरे, तू असा विचार करतोस असे मला वाटले नव्हते' असे म्हणतॊ तेंव्हा बहुतेक वेळा त्याला 'मला तू आमच्यातला वाटत होतास' असे म्हणायचे असते.

'प्रत्येकजण आपल्यासारखा विचार करतो' या पूर्वाग्रहाला मानसशात्रात 'खोट्या एकमताचा पूर्वाग्रह' (false-consensus bias) असे म्हणतात. हा समज बरेचदा दूरचित्रवाणीवरील मालिका बघताना (या असल्या सासू-सुनेच्या मालिका कोण बघतो ?) आणि राजकारणात ( या असल्या नेत्यांना मते कशी मिळतात ?) प्रकर्षाने दिसून येतो. सोशल मीडियावर तर हा गैरसमज वेगाने आणि मोठया प्रमाणात पसरतो. आपल्या समविचारी मित्रांची मते वाचून आपल्याला वाटू लागते कि फक्त आपणच तर्कशुद्ध  विचार करतो आणि बाकी सगळे लोक मूर्ख आहेत ज्यांना एवढ्या साध्या गोष्टीसुद्धा समजत नाहीत. हा संकुचित विचार फारच घातक आहे आणि सोशल मीडियाचा विधायक वापर करायचा असेल तर हा गैरसमज आधी सोडून द्यायला पाहिजे. या गैरसमजामुळे सगळीकडे फक्त स्वतःचा प्रतिध्वनी ऐकू येतो आणि एखाद्या घटनेवर कोणी विरोधी मते मांडली तर आपल्याला धक्का बसतो. इंटरनेटमुळे सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय मतांमधील फरक हळूहळू संपत जातो. 'माझी आणि माझ्या मित्राच्या मालिकांची आवड सारखी आहे' वरून आपली विचारसरणी कालांतराने 'अमुक मालिका आवडत असेल तरच हा माझा मित्र ! ' अशी बनते.समोरची व्यक्ती आपल्या विचारसरणीची नसेल तर बहुदा आपली पहिली प्रतिक्रिया समोरच्याला मूर्ख समजण्याची असते. अर्थातच या जगात द्वेष आणि हिंसा पसरवणारे काही थोडे लोक आहेत पण मी अश्या बहुसंख्य लोकांविषयी बोलतोय ज्यांची एकाद्या विषयावर आपल्यापेक्षा वेगळी आणि प्रांजळ मते असतात आणि त्यामागची विचारसरणी सुध्दा तुमच्यासारखीच तार्किक असते. हा राजकीय अचूकतेचा प्रश्न नाही. आपल्यापेक्षा वेगळ्या विचारांची व्यक्ती बरोबर असू शकतो हि शक्यताच आपण नाकारतो. दुसऱ्यांच्या विचारांबद्दल कुतूहल दाखवण्यापेक्षा मग आपण फक्त आपल्याशी जुळणारे विचार वाचून स्वतःची पाठ थोपटून घेतो. फक्त आपल्या विचारसरणीचे लेख पुढे पाठवून आपण जास्त ज्ञानी बनत नाही तर उलट कुपमंडक वृत्तीचे बनतो. वेगळा विचार करण्याची क्षमता घालवून आपण झुंडीत सहभागी होतो. सोशल मीडियावर स्वतःची एक प्रतिमा बनवून ती टिकवून ठेवण्यासाठी खऱ्या गोष्टींपेक्षा प्रसंगी खोट्या बातम्या फॉरवर्ड करतो.

यावर उपाय म्हणजे सोशल मीडियामध्ये बनवलेली स्वतःची प्रतिमा छेदून आपल्या विरुद्ध मताच्या लोकांसोबत संवाद साधायला शिकले पाहिजे. समोरच्या व्यक्तीला मूर्ख न समजता त्याची विचारसरणी जाणून घेतली पाहिजे. प्रत्येक वेळी 'आपण चुकीचे असू शकतो' अश्या खुल्या विचाराने संवाद केला पाहिजे. सोशल मीडियावर सर्वत्र लीलया वावरणारे  तुम्ही कधी कधी चुकीचे पण असू शकता ना ? तुमच्यापेक्षा वेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या, वेगळ्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीत जगणाऱ्या लोकांचे विचार वेगळे असू शकतात. कदाचित तुम्हाला सगळ्या गोष्टी माहितपण नसतील. सोशल मीडियावरील वाद बघा. राहुल गांधींना पाठिंबा देणारे लोक तुम्हाला मूर्ख वाटतात का ? त्यांच्या वागण्यामागे काहीतरी वैचारिक कारण असू शकेल. ते कारण समजून घेतल्यावरच आपण त्यांच्याशी चर्चा करू शकतो. दुसऱ्यावर चिखलफेक करून आपण आनंद मिळवू शकतो पण दुसऱ्यांचे विचार समजून घेतल्याशिवाय आपण प्रगती करू शकत नाही. त्यांची बाजू ऐकून घेतल्याशिवाय तुम्ही त्यांना तुमची बाजू समजावू शकत नाही.

पुढच्या वेळी सोशल मीडियावर भांडताना एक गोष्ट करून बघा: समोरच्याला तुमची बाजू पटवण्याऐवजी त्याची बाजू ऐकून त्याच्या मतातील कच्चे दुवे हेरून फक्त त्याला प्रश्न विचारा. सोशल मीडियावर काहीही टाकण्यापूर्वी मी हे का पोस्ट करतोय याचा विचार करा. तुम्ही विचार न केलेली एखादी गोष्ट तुम्हाला कळली का फक्त तुमच्या आवडीची गोष्ट फॉरवर्ड करून तुम्हाला लाईक्स मिळवायचे आहेत ? समोरच्या व्यक्तीला मूर्ख म्हणून झटकून टाकण्यापेक्षा 'कदाचित हा बरोबर असेल. काय म्हणतोय ते तरी बघु'  असे म्हणून खुल्या दिलाने विचार करा.


The 'Other Side' is not dumb या लेखाचे स्वैर भाषांतर.

0 प्रतिक्रिया: