0

Random Thoughts - 13

पुण्यात गाडी चालवणे म्हणजे पोकर खेळण्यासारखे आहे. जसे बॉंण्ड म्हणतो त्याप्रमाणे "In poker you never play your hand. You play the man across from you."  तशी, तुमची गाडी कोणती आहे किंवा तुम्ही कशी चालवत आहात यापेक्षा समोरच्या माणसाचीच चूक आहे असा निगरगट्ट चेहरा करून  चालवता आली पाहिजे. तुमचे पत्ते फारच भारी असतील तर तुम्ही निश्चिंत असता. नाहीतर दोन्ही बाजू bluff करत राहतात आणि शेवटी show time आल्यावर एकजण माघार  घेतो.

पुण्यात गाडी चालवताना तुम्ही एकतर शिव्या खाता अथवा शिव्या देता. दोन्ही न करणारे लोक फारच दुर्मिळ आहेत.

पुण्यात रस्त्याच्या कडेला किंवा दुभाजकावर झाडे कशाला लावतात याचे उत्तर अखेर मला मिळाले. दररोज कुठेनाकुठे तरी पी. एम. टी. च्या बसेस बंद पडलेल्या दिसतात (पुणे बस डे झाल्यापासून सकाळमध्ये बंद पडलेल्या बसेसचे फोटो येत नसले तरी !). आणि बस बंद पडली कि बसच्या मागे, बाजूला झाडाच्या फांद्या तोडून लावतात. यामागे काही आयुर्वेदिक कारण आहे का ते माहित नाही पण रोज बस मध्ये अश्या फांद्या घेवून फिरण्यापेक्षा जिथे बस बंद पडेल तिकडे ताज्या फांद्या मिळण्यासाठी अशी झाडे लावत असावेत असे माझे मत झाले आहे.

''येथे लग्न, पार्टीच्या ऑर्डर्स स्वीकारल्या जातील'  असे लिहिलेल्या गाड्यांवर कोणी पार्टीच्या ऑर्डर देतात का ? केशकर्तनालयात जी जपानी(का कोरिअन ?) तरुणांच्या हेअरस्टाइल चे फोटो लावले असतात तशी हेअरस्टाइल कोणी करतं का ? का दुकानच्या सर्टिफ़िकेट सारखे हे पोस्टर लावणे सुद्धा त्यांना बंधनकारक असते ?

dandruff हटवण्याच्या एवढ्या जाहिराती पाहिल्यावर dandruff घालवण्यापेक्षा टक्कल करून परत केस उगवणे सोपे आहे असे लागले आहे. आणि काळे कपडे घालणे  महत्वाचे असेल तर dandruff तात्पुरता काळा करण्याचे एखादे औषध का तयार करत नाहीत ?

आईला जसे आपल्या मुलाचे रडणे ओळखता येते तसे लोकांना आपल्या मोबाइलचा रिंगटोन ओळखता येतो.