9

फोटोग्राफी - एक छंद


रोगांच्या जश्या साथी असतात तशाच छंदांच्या सुद्धा साथी असतात. स्थळ-काळानुसार या वेगवेगळ्या छंदांच्या साथी पसरलेल्या दिसून येतात. सध्याच्या काळात फोटोग्राफीच्या साथीचा सुळसुळात झालेला दिसतो.

साधारणपणे  "नवीन SLR कॅमेरा घेतला" असा निरुपद्रवी वाटणारा फेसबुक अपडेट दिसला कि मला पुढली चिन्हे दिसू लागतात. मग थोड्याच दिवसांत "<नाव आडनाव> Photography " किंवा "<टोपणनाव> Photography" असल्या नावाचे फेसबुक पेज तयार होते. आणि आपल्याला ते पेज लाईक करायला सांगितले जाते. हळू हळू अपडेट्सची संख्या वाढू लागते. सुरुवातीला फोटोग्राफीचे मुलभूत माहिती देणारी वेबपेजेस, बाकी फोटोग्राफर्सचे फोटो, फोटोग्राफीच्या कोर्सेसची माहिती आणि असे बरेच काही शेअर केले जाते.

कॅमेरा हातात आल्यावर लोकांना नवा दृष्टीकोन येतो. म्हातारी माणसे , लहान मुले, गावाकडचा मातीचा रस्ता, डोंगर, शेते या मध्ये नवे सौदर्य दिसू लागते. आता प्रत्येक गोष्ट लेन्स मागून कशी दिसेल याचा विचार केला जातो. त्यांच्या बोलण्यात आता सारखे १८-२५-५०-८० असले काही तरी लेन्स चे प्रकार, फोटोग्राफी मधल्या टर्म्स येवू लागतात.

अश्या वेगवेगळ्या objects चे (का subjects चे ?) फोटो काढून "Random clicks" किंवा "world through my lenses " असल्या नावाच्या अल्बम मधले टाकले जातात. फोटो नुसते काढून भागत नाही. photoshop मधली सगळी फीचर्स आपल्याला वापरतात येतात हे लोकांना कळण्यासाठी फोटोवर नको तेवढे इफेक्ट्स लावले जातात. "खरे चित्र कसे असेल ओळखा ?" असली स्पर्धा या लोकांमध्ये भरवायला काही हरकत नाही. एकाच ठिकाणी फोटो असला तर ठीक, नाहीतर डझनभर साईट्स, instagram व इतर ठिकाणी एकाच फोटो अपलोड करून त्याच्या लिंक्स सगळीकडे शेअर केल्या जातात.

काही लोक ज्याप्रमाणे FourSquare वर check-in करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातात त्याप्रमाणे काही फोटोग्राफर्स "मी या ठिकाणी जाऊन फोटो काढले" असे दाखवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फोटो काढतात. गणपती, दिवाळी असे काही सण, महत्वाच्या स्पर्धा, सवाई सारखे कार्यक्रम झाल्यावर सगळीकडे एकाच प्रकारच्या फोटोंचा खच पडलेला दिसतो.

तर हे छंदी लोक आणि साधे लोक यात फरक काय ? जर एखादा फोटो खराब आला तर यांना technical terms मध्ये तो का खराब आलाय हे सांगता येते आणि सध्या लोकांना "फोटो गंडलाय" एवढेच सांगता येते.