7

तू-तू-मैं-मैं

मी - आई, काय हे ? मला ऑफिसमधून आल्या-आल्या तुझ्या सासू-सुनेच्या रडक्या मालिका बघाव्या लागतात.
आई - पण तू कुठे या मालिका बघतोस ? तू आल्या आल्या लगेच तुझ्या खोलीत जाऊन कॉम्पुटरवर तुझ्या मालिका बघत बसतोस.
मी- या रटाळ मालिकांपेक्षा माझ्या मालिका कधीही चांगल्या आहेत.
आई -मी पण असेच म्हणू शकते.
मी - आता मात्र हद्द झाली. उगीच काहीही बोलू नको.
आई - का ? तुझ्या मालिका का चांगल्या ? त्या इंग्लिश आहेत म्हणून ?
मी - भाषेचा काय संबंध ? काय या तुझ्या मालिकांच्या कथा ? बायका नुसत्या नटून थटून कट-कारस्थान करत असतात आणि पुरुष बाहेर लफडी करत असतात. घडते का कधी असले कोणाच्या आयुष्यात ?
आई - असे घडत नाही ते मलाही माहिती आहे रे. ते LOST मधले बेट, ते तुरुंग फोडणारे, तुरुंगातून ४० वर्षांनी परत प्रकट होणारे कैदी यातल्या कोणत्या गोष्टी घडतात रे मग ? आणि तसेही माझ्या मालिकांच्या सुरुवातीला "सर्व पात्रे व कथानक काल्पनिक आहे" असल्या आशयाची सूचना दाखवतात. तुझ्या मालिकांमध्ये दाखवतात का अशी सूचना कि ते पण आपणच समजून घायचे.
मी - काही मालिका fiction आहेत. पण चांगल्याही आहेत कि बऱ्याच.
आई - इकडे पण चांगल्या आहेत कि काही, एका लग्नाची दुसरी गोष्ट, तारक मेहता आणि इतर काही. तिकडे मालिका जास्त असतील त्यामुळे त्यातल्या चांगल्या मालिकांची संख्या जास्त असेल कदाचित. इकडे मालिका कमी असल्यामुळे त्यातल्या त्यात चांगल्या असलेल्यांची संख्या कमी आहे. पण ratio साधारण सारखाच असणार.
मी- असेल. पण त्या आठवड्यातून एकदा असतात. आणि मध्ये मध्ये ३-४ महिने बंद असतात.
आई - असतील. पण तू दररोज एवढ्या मालिका डाउनलोड करतोस कि २-३ तास तरी जातातच त्यात. आणि मालिका बंद असतील तेंव्हा तू गप्प बसतोस का ? नवीन मालिका बघायला चालू करतोस लगेच. आणि तू ह्या सगळ्या मालिका फुकट
डाउनलोड करतोस. मी केबलचे पैसे देऊन बघते.
मी - त्याचा काय संबंध ?
आई - काही नाही. सांगतेय फक्त की तू पायरसी करतोस आणि मी नाही. मी मालिका बघत असले तरी तुला जेवायला द्यायला एकदातरी उशीर झालाय का ? मी तुला काम सांगितले की तू मात्र मालिका बघत असल्याचे सांगतोस.
मी - करतो ना पण मी काम जरा वेळाने तरी. तू आधी मालिका करत बघतेस नि दुसरया दिवशी शेजारच्या काकुंसोबत प्रत्यक्ष किंवा फोनवर त्याबद्दल चर्चा करत बसतेस.
आई - मग काय झाले ? आम्ही दोघीच तर बोलतो. तुम्ही तर फेसबुक, twiiter , buzz अश्या सगळ्या ठिकाणी आख्या गावासमोर चर्चा करत बसता. आमच्या दोघींच्या चर्चेपेक्षा ते चांगले कसे ?
मी - फेसबुक, twitter बद्दल काही बोलू नको. तूसुद्धा आता फेसबुकवर आली आहेस की.
आई - हो. पण मी तिकडे मालिकांच्या चर्चा करत नाही.  कुठे काय बोलायचे ते मला चांगले माहित आहे.
मी - आता उगीच त्यावर बोलणे चालू करू नकोस. सकाळ मध्ये सोशल नेटवर्किंगवर लेख आलाय का आज ? उगीच काहीतरी छापत असतात ते.
आम्हाला फुकटचा वैताग !
आई - आता तू विषय बदलू नकोस. तू माझ्या मालिकांना नावे ठेवतोस. मी तुझ्या मालिकांना  ठेवते. तू पाहिजे तर मला समाजातील अश्या हिंदी, मराठी चांगल्या, जुन्या मालिका डाउनलोड करून दे. मी त्या बघीन. बोल, आहेस तयार ?
मी - बघतो. जुन्या हिंदी मालिका नेटवर पण फारश्या नाहीयेत. त्यापेक्षा मी माझ्या मालिका बघतो. तू तुझ्या बघ.

--
मी रोज घरी येतो. घरी कुठलीतरी मराठी मालिका चालू असते. मी वरचे संभाषण imagine करतो. मग शांतपणे खोलीत जाऊन मालिका बघणे चालू करतो. कदाचित यापेक्षा वेगळे संभाषण होईलही पण मी तेवढी रिस्क घेत नाही.