9

काय म्हणता ?

"काय राजा, काय म्हणतोस ? शिक्षण संपले न तुझे आता ? आता पुढे काय ? नोकरी ? कुठे ? तुला Infosys मध्ये पण मिळाली होतीस ना ? मग तिकडे का नाही जात ? माझ्या अमुक-अमुक चा तमुक आहे Infosys मध्ये"
"काय राजा, काय म्हणते नोकरी ? तुम्हा IT वाल्यांची ऐट असते एकदम. ५ दिवस काम, २ दिवस आराम !"
"काय राजा, कालची रेव्ह पार्टी आणि अटकेची बातमी वाचलीस का ? IT वाले होते म्हणे बरेच. तुझ्या ओळखीचे होते का कोणी ? तुम्ही असले काही करत नाही ना ? तुम्ही चांगल्या संस्कारी घरातील मुले असे काही करणार नाहीच म्हणा, पण काळजी वाटते म्हणून विचारले."
"काय राजा, नोकरी लागली, आता जागेचे काय ? काय म्हणतोस ? भाव वाढलेत ? ते पण आहेच म्हणा, पण खरे सांगू का, तुम्हा IT वाल्यांमुळेच पुण्यात जागेच भाव एवढे वाढले आहे. "
"काय राजा, अमेरिकेला जाणारेस म्हणे, छान छान, इकडे परत येणारे का तिकडेच settle होणार आता ?"
"काय राजा, आहे का ओळख ? नाही तू आता अमेरिका रिटर्न, तू कशाला आमची ओळख ठेवतोस ?"
"काय राजा, आता लग्न कधी ? का जमवले आहेस तू तुझे तुझे ? तसे असले तरी आम्हाला सांगितलेस तरी चालेल हो ! हल्लीची पिढी पुढारलेली आहे. "
"काय राजा, कसा चालू आहे संसार ? लग्न बाकी उत्तम झाले हो ! आणि आपल्यातीलच केलीस हे उत्तम !"
"काय राजा, good news कधी देणार आहेस ?"
"राजा, good news मिळाली हो ! अभिनंदन !"
"राजा, मुलगा अगदी गोड आहे, तुझ्यावरच गेलेला दिसतोय."
"काय राजा, काय नाव ठेवलेस मुलाचे ? अथर्व ? उत्तम !"
"काय राजा, मुलाला कोणत्या शाळेत घालणार आहेस ? तू काय इंग्रजी शाळेतच घालणार म्हणा ! फिया केवढ्या वाढल्यात हल्ली ! तरी तुमचे double income आहे, त्यामुळे तुम्हाला काही टेन्शन नाही. "
.
.
.
(अशीच बाष्कळ बडबड..)
.
.
.
"काय राजा, मुलाला पण कॉम्पुटर इंजिनियर करणार का ?"
"काय राजा, पेढे कुठे आहेत अथर्वच्या बारावीच्या निकालाचे ? "
"काय राजा, मुलाला कुठे मिळाली admission ? PICT ? हे कुठे आहे ? हल्ली काय म्हणा, गल्लोगल्ली कॉलेजेस निघाली आहेत. पैसे फेका आणि डिग्र्या घ्या. "
.
.
"काय अथर्व, शिक्षण संपले ना तुझे ? आता पुढे काय ?"
6

Random Thoughts - 12

१) पुण्यातील खड्डे आणि गतिरोधक यांची तुलना -
साम्ये -
रस्त्यावर कुठेही, कोणत्याही आकारात, कोणत्याही कारणाशिवाय उगवतात.
एकदा उगवले कि लवकर जात नाहीत.
गाडी २ फुटावर नेल्याशिवाय त्यांचे अस्तित्व लक्षात येत नाही.
दोघांमुळे पाठीला तेवढाच त्रास होतो.
फरक -
गतीरोधकामध्ये खड्डा असू शकतो. खड्ड्यात गतिरोधक नसतो.

२) १०० च्या स्पीडने दुचाकी चालवताना रस्त्यावर समोर कुत्रा आल्याचा अनुभव आला आहे का कधी ? ज्याप्रमाणे Infinite improbability drive विश्वातील प्रत्येक ठिकाणी almost एकाच वेळी जाऊन येते, त्याचप्रमाणे कुत्रा दिसल्यापासून अपघात होईपर्यंत/ टळेपर्यंत almost एकाच वेळी सगळ्या विचारांना भेट देऊन येते.

३) " काय बोलले आहे यापेक्षा ते कोणी बोलले आहे हे जास्त महत्वाचे आहे." - पु. ल. देशपांडे
सध्या या वाक्याचा बराच अनुभव येताना दिसतोय. राजकारणात तर फारच !

वरील वाक्यासमोर पुलंचे नाव लिहिण्यामागे दोन उद्देश आहेत. पहिले म्हणजे हे त्यांचे वाक्य आहे आणि जर तुम्हाला हे वाक्य समजले असेल तर दुसरा उद्देश सांगायची गरज नाही.

४) पुण्यात सिटीप्राईडचे अजून एक मल्टीप्लेक्स चालू होणारे. ते वाचून माझ्या मनात आलेला हा ग्राफ -

५) अमिताभ आता दिसेल ते उत्पादनांच्या जाहिराती करत आहे. आता फक्त sanitary napkin ची जाहिरात बाकी आहे. कदाचित काही दिवसांत तो ती पण करेल. अक्चुली, ती जाहिरात कशी असेल याबद्दल मी अंदाज केला आहे. जाहीरातीत अमिताभ म्हणेल, "आयुष्याच्या एका टप्प्यावर मला जीवनसाथी म्हणून दोन पैकी एका स्त्रीला निवडायचे होते. मी जयाला निवडले कारण तिच्याजवळ होता आत्मविश्वास, जो फक्त ... वापरून मिळतो."