28

कर्णवैद्याचा एक अनुभव

कानात दडा बसल्यामुळे काल जवळच्या ENT specialist कडे गेलो होतो. डॉक्टर साधारणत: सत्तरी पार केलेले होते.
डॉ - काय होतंय ?
मी - पोहायला गेलो होतो. त्यामुळे कानात दडा बसलाय. ऐकायला कमी येतंय एकदम.
डॉ - कुठे गेला होता पोहायला ?
मी - गावाला. विहिरीत.
डॉ - कोणते गाव ?
मी - श्रीवर्धन.
डॉ - कोणते ?
मी - (अजून मोठ्या आवाजात) श्रीवर्धन.
डॉ - कुठले ?
मी - (अजून मोठ्या आवाजात) श्रीवर्धन.

मला एकतर कमी ऐकायला येत असल्यामुळे माझ्या बोलण्याचा आवाज कमी होता. त्यामुळे समोरच्याला ऐकू येत आहे कि नाही याचा अंदाज घेवून बोलावे लागत होते. डॉक्टरांच्या प्रश्नाने मला कळेना कि हे माझी फिरकी घेत आहेत कि यांना खरोखर कमी ऐकू येते कि येणाऱ्या सगळ्याच रुग्णांशी हे असे वागतात आणि त्यांना बुचकळ्यात टाकतात.

डॉ - श्रीगोंदा ? तिकडे आहेत का एवढ्या विहिरी.
मी - (अजून मोठ्या आवाजात) श्रीवर्धन.
डॉ - अच्छा श्रीवर्धन. मग विहिरीत का गेलास ? समुद्रात जायचे की?
मी - (मनात) कुठे गेलो ते महत्वाचे नाहीये.
(उघडपणे - काहीतरी बोलायचे म्हणून) विहिरीत पोहण्याची वेगळी मजा असते.
डॉ - किती दिवस गेला होतास गावाला ?
मी - ३
डॉ - मग तिन्ही दिवस पोहालास का ?
मी - हो
डॉ - मग विहिरीत सूर, मुटके वगैरे सगळे मारले का ?
मी - हो.

एवढा सवाल-जवाब झाल्यावर शेवटी त्यांनी माझे कान तपासायला घेतले. "पाण्यात पोहाल्याने कानात घट्ट बसलेला मळ सैल झाला आहे. तो काढावा लागेल. हल्ली कानाकडे कोणी लक्षच देत नाही. यांना नुसते स्टायलीश हेअर-कट, फेस क्रीम पाहिजे." मला वाटले आता हे "हल्लीच्या पोरांना.." वर दळण दळत बसणार. पण अजून फारसे काही न बोलता त्यांनी उजव्या कानातील मळ काढण्यास सुरुवात केली. एक लाब आणि बारीक अवजार कानात घातल्यावर कानाच्या पडद्याला एकदम वेदना झाल्यामुळे मी कळवळलो. "अरे ओरडतोस काय ?" माझ्याकडे त्रासिक चेहरा करून ते म्हणाले. जसे काय जगात असा ओरडणारा मीच पहिला आहे.

"हे बघ. तुझ्याकडे ३ पर्याय आहेत. मी आत्ता मळ काढतोय तसा काढणार. त्याला २ मिनिटे त्रास होईल पण लगेच साफ होईल. दुसरे म्हणजे मी दोन्ही कानांच्या जवळ तो भाग बधीर करण्यासाठी २ इंजेक्शन देणार. तिसरे म्हणजे मी काही औषधे लिहून देणार. ती कानात घालून २ दिवसांनी ये. मग मळ काढू. पण मग २ दिवस दडा तसाच राहील. काय करतोस बोल." मी शांतपणे पहिला पर्याय निवडला. एव्हाना मला कळून चुकले होते कि त्यांना ऐकायला फारच कमी येते. कमी ऐकू येणारा ENT specialist मी कधी imagine च केला नव्हता. अवजार कानात घातल्यावर माझे बारीक आवाजातील ओरडणे परत सुरु झाले. ओरडण्याचा आवाज फक्त "आ आ " असाच राहून त्यापुढे "आई"ची चौकशी करणारे अपशब्द तोंडात येवू नये यासाठी मला विशेष काळजे घावी लागत होती. त्यातच डॉक्टरांनी म्हणाले, "अरे ओरडतोस कशाला ? ओरडून काही होणारे का ?" आवरा ! कसला ultimate प्रश्न आहे. वेदना झाल्यावर माणूस का ओरडतो याचा मी कधी विचारच केला नव्हता. हे स्वाभाविक असले तरी काहीतरी कारण असणारच ना यामागे. हा विचार करण्यात थोडा वेळ गेला. तेवढ्यात त्यांनी पिचकारीसारखे काहीतरी उपकरण काढले आणि त्यात पाणी भरून कानात जोरात फवारले. त्या पाण्याच्या प्रेशरने मळ काढण्याचा त्यांचा हेतू होतो. पाण्याचा तो जोरदार प्रवाह कानाच्या पडद्यावर आदळल्यावर मी परत ओरडलो. "अरे ओरडतोस काय ? नुसते पाणी तर आहे." इति डॉक्टर.

शेवटी हा प्रकार संपल्यावर शुक्रवारी येण्यास सांगितल्यावर मी घरी आलो. पण घरी आल्यावर एका कानाचा त्रास जास्तच वाढला. संध्याकाळी परत डॉक्टरांकडे गेलो. त्यांना बघितल्यावर मी स्मितहास्य केले.
त्यांनी अजिबात ओळख न दाखवता विचारले, "काय झालाय ?"
"मी सकाळी तुमच्याकडे आलो होतो. कानाचा त्रास वाढली अजून." मी म्हणालो.
"माझ्याकडे आला होतात. कधी ? "- डॉ.
मी - (मनात) -आवरा ! यांना लक्षात पण राहत नाही असे दिसतंय. मग हे औषधे तरी कशी काय देतात ?
(उघडपणे) सकाळी आलो होतो. तुम्ही वहीत लिहून ठेवलाय बघा.

सकाळी माझी चौकशी करून त्यांनी वहीत लिहून माझ्याबद्दल लिहून ठेवले होते. आजाराच्या वर्णनासोबतच "was swimming in the well in shriwardhan" हे सुद्धा लिहिले होते. साहजिकच आहे ! लक्षात न राहणारा माणूस अजून काय करणार ? त्यांच्या वहीवरून समजले कि दिवसभरात त्यांनी तपासलेला रुग्ण मी एकटाच होतो. पुन्हा एकदा औषध घेवून मी निघालो. फीचे पैसे देताना मी १०-१० च्या जरा जुन्या, मळलेल्या नोटा दिल्या. "मारवाड्याकडून नोटा आणल्या का ह्या ? साधारणपणे मारवाड्याकडे किंवा किराणामालाच्या दुकानात अश्या नोटा मिळतात" डॉक्टरांनी अजून १ डायलॉग टाकला. काय म्हणणार मी आता यावर. "हं हं" करून मी निघालो.

डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा गुण नंतर मात्र आलाय. आता परत शुक्रवारी बोलावलंय. बघूया, काय घडतं तेंव्हा !