6

प्रिन्स - देशी सुपरहिरो

प्रिन्स चित्रपटाच्या जाहिरातीवरून हा चित्रपट फक्त बोर्न सिरीज वरून ढापला असेल वाटले होते. मजीद माजिदीचे सहा चित्रपट ओळीने बघितल्यानंतर जरा बदल म्हणून एक विनोदी चित्रपट पाहावा म्हणून प्रिन्स बघण्याचे धाडस केले. आणि हा चित्रपट अपेक्षेप्रमाणेच विनोदी निघाला. या चित्रपटाची जाहिरात "from the makers of Race" अशी केली जाते. आता ही काय अभिमानाने सांगायची गोष्ट आहे का ? या चित्रपटाबद्दल आणि एकूणच अश्या प्रकारच्या चित्रपटांबद्दलची माझी काही निरीक्षणे -

१) चित्रपटाची सुरुवात प्रिन्सने केलेल्या एका तथाकथित फंडू चोरीने होते. प्रिन्स किती भारी चोर आहे, हे दाखवण्याचा हा प्रयत्न असावा. हिंदी चित्रपटातील असली चोरीची दृश्ये मला अशी विनोदी का वाटतात ते समजत नाही. उगीच काळे कपडे घालून, संगणकावरील २-४ बटणे दाबून काहीही करणारे हे चोर हे सगळे शिकतात कुठे ? crash course असतो का कुठे याचा ? धूम, किडनॅप व अश्या अनेक चित्रपटांमध्ये असे दाखवले आहे.

२) प्रिन्स हा जगातील फार मोठ्या गुन्हेगारासाठी काम करत असतो. आता हे अतिमोठे गुन्हेगार सगळी कामे स्वत:च का करतात ? कोणत्याही मामुली माणसाला मारायला पण हे स्वत:च का जातात ? ओसामा ने स्वत: हत्यार हातात घेतल्याचे माझ्या ऐकिवात नाही.

३) हल्ली चित्रपटाची कथा परदेशात घडते. गुन्हा घडला कि त्याचा तपास करणारा पोलीस अधिकारी भारतीय असतो आणि त्याच्या हाताखाली गोरे लोक असतात. प्रिन्स मध्ये तर सी.बी.आय.ची आख्खी ब्रांच आफ्रिकेत असते. आणि ते लोक तिकडे पूर्ण अधिकाराने काहीही करत फिरत असतात. खरे म्हणजे सी.बी.आय भारतात काय काम करते हाच प्रश्न आहे. कोणतेही प्रकरण सी.बी.आय कडे सोपवेपर्यंत त्याचा गाजावाजा होतो नंतर काही बातमी येत नाही. इथे जर अशी स्थिती आहे तर आफ्रिकेत ते जातीलच कशाला?

४) चित्रपटात प्रिन्सची स्मरणशक्ती निघून गेल्यावर थोड्या वेळाच्या अंतरात ३ वेगवेगळ्या मुली येवून त्या त्याची प्रेयसी असल्याचे आणि त्याच्यावर प्रेम करत असल्याचे सांगतात. हे बघून "प्रिन्स दुल्हनिया ले जायेगा" हा कार्यक्रम तर मी बघत नाहीये ना अशी शंका मला आली.

५) प्रिन्स फक्त बोर्न सिरीज वरून ढापला असेल मला वाटले होते. पण पुढे पुढे बघताना अनेक प्रसंग वेगवेगळ्या चित्रपटातून उचलल्याचे वाटत होते. याला म्हणतात अभ्यास ! एवढे चित्रपट बघायचे आणि त्यातील चांगले प्रसंग निवडून एका चित्रपटात आणण्याचा प्रयत्न करायचा. याबद्दल तरी चित्रपट निर्मात्यांसाठी एका जोरदार टाळ्या झाल्याचा पाहिजेत.

६) चित्रपटात दाखवलेला मेमरी चीप चा शोध तर अप्रतिमच आहे.या चीपच्या सहाय्याने माणसाच्या सर्व आठवणी पडद्यावर चित्रपटाच्या स्वरुपात दिसतात आणि त्या बदलता सुद्धा येतात. अगदी खोडता सुद्धा येतात. आणि हे बदल माणूस झोपेपर्यंत अस्तित्वात येत नाही. आपण झोपल्यावर आपली मेमरी म्हणे reboot होते आणि मग हे स्मरणशक्तीमधील बदल दिसून येतात. काय सुंदर कल्पना आहे ! अर्थातच आता या चीप च्या मागे सगळे लोक लागलेले असतात. आणि प्रिन्सची स्मरणशक्ती या चीपचा वापर करून पूर्णपणे खोडलेली असते. सगळ्या चित्रपटात जे घडते तेच शेवटी इकडे पण घडते. प्रिन्सची स्मरणशक्ती परत येते, चीप योग्य हातांत पडते, प्रेमाचा विजय होतो इत्यादी इत्यादी.

प्रिन्सचे scene by scene विनोदी परीक्षण तुम्हाला इथे वाचता येईल.

6 प्रतिक्रिया:

आनंद पत्रे said...

प्रिन्स सारख्या विनोदी चित्रपटाला बर्‍याच सिरियसली तू पाहिलं हे नक्की... :-)

आपले ऍक्शन चित्रपट ठोकळेबाजंच राहणार...

तुझं निरीक्षण मात्र मस्तंच...

अभिजीत said...

आनंदजी,

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! मी प्रिन्स सारखे चित्रपट सिरीयसली विनोदी म्हणूनच पाहतो.

kayvatelte said...

पैसे वाचवले माझे.. :) नाहीतर कदाचित गेलॊ पण असतो पहायला. आता नेट वर पण पहाणार नाही हा सिनेमा.

विशाल तेलंग्रे said...

हा हा.. तुझं चित्रपटाबद्दलचं वर्णन पण तसं फारच कॉमेडी आहे... क्लासमेट्स सोबत पाहायचा प्लॅन होता.. बदलला! ह्म्म,... (काही नाही!)

;)

पोस्ट मात्र ग्रेट झालिय..

अभिजीत said...

महेंद्रजी,
तुमचे पैसे वाचल्याबद्दल मला आनंदच झाला आहे. पण कधीतरी टाईमपास म्हणून नेट वर बघायला हरकत नाही हा चित्रपट. :P

विशाल,
धन्यवाद ! मित्रांसोबत थेटरात बघायला काही हरकत नाही. चित्रपटापेक्षा तो बघताना comments टाकायला जास्त मजा येईल.

Salil said...

ekk numberrr jamlay!!
Go Prince!

senseless entertainment!!