3

समुद्रापारचे समाज

"शाळा"चे लेखक म्हणून मिलिंद बोकील आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आहेत. त्यांची "झेन गार्डन" वगळता इतर पुस्तके मी वाचली नव्हती. काही दिवसापूर्वीच त्यांचे समुद्रापारचे समाज हे पुस्तक वाचले आणि मी भारावून गेलो.

देशोदेशीच्या वेगवेगळ्या समाजांवर लिहिलेले हे लेख आहेत. पण हे नुसतेच प्रवासवर्णन नाही. तर विकास, समृद्धी, संस्कृती, जागतिकीकरण, जातीव्यवस्था या विषयांवरचे आपले पूर्वग्रह हलवण्याचे काम हे लेख करतात.

उत्तर फिलिपीन्सच्या इफूगाओ प्रांतातले आदिवासी, बैरॉईटमधील एक समाजकार्य करणारा समूह, कोस्टा रिका मधील जंगल पर्यटन, ऍमस्टरडॅम आणि थायलंडमधील देहविक्री, वर्णभेदाने दुभंगलेला झिम्बाब्वे, जपानमधले दलित, नैसर्गिक शेती करणारे ब्राझील मधील शेतकरी असे अनेक विषय मिलिद बोकील यांनी हाताळले आहेत. प्रत्येक ठिकाणच्या व्यवस्थेची आपल्या समाजव्यवस्थेची तुलनाही केली आहे.

"माबुहाय इफ़ुगाओ" या लेखात तथाकथित मागासलेल्या आदिवासींच्या समृद्ध जीवनपद्धतीबद्दल ते सांगतात. निसर्गाचा कमीत कमी नाश करून, परस्परांस मदत करून, पाश्चिमात्य विकासवाद्यांच्या आक्रमणाला तोंड देत आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न त्यांनी मांडला आहे.
"बैरॉईटचे मित्र" या लेखात बोकीलांनी बैरॉईटमधील एका समाजकार्य करणाऱ्या समूहाची ओळख करून दिली आहे. त्यांच्यातील एका सोबत झालेले बोकीलांचे तात्विक संभाषण त्यांनी दिले आहे. ते अंतर्मुख करणारे आहे.
"कोस्टा रिका" मध्ये कोस्टा रिकातील जंगल पर्यटन, परराष्ट्रीय कंपन्याच्या हाती असलेला तिथला कारभार आणि त्याचा निसर्गावर, तिथल्या स्थानिक लोकांवर होणारा परिणाम यावर बोकील भाष्य करतात.
"ऍमस्टरडॅम" आणि "अमेझिंग थायलंड" या लेखात लैंगिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असेलेल्या ऍमस्टरडॅम आणि थायलंड या ठिकाणच्या लैंगिक शोषणाबद्दल लिहिले आहे. बाजारीकरण, जागतिकीकरण याच्या नावाखाली प्रस्थापित होणाऱ्या उपभोगवादी बाजारू व्यवस्थाचे दर्शन आपल्याला घडते.
"झिम्बाब्वे : गोरा आणि काळा' आणि 'जपानमधील दलित' या लेखांमध्ये हीन समजल्या जाणार्‍या समाजघटकांबद्दल बोकीलांनी लिहिले आहे. वसाहतवादामुळे झिम्बाब्वेतील काळ्या लोकांची, तसेच जपान मधील "बुराकू" समुदायाची स्थिती त्यांनी मांडली आहे. एकाद्या घटकाला हीन ठरवणे, त्याच्या प्रगतीच्या वाट बंद करणे हे सर्वत्र कसे सारखे आहे हे या लेखांत विस्ताराने सागितले आहे.
"जागे झाले ब्राझिलचे शेतकरी" या शेवटच्या लेखात नैसर्गिक शेतीकडे वळलेल्या ब्राझील मधील शेतकऱ्यांची कथा आहे. भारतीय शेतकऱ्यांनी बोध घेण्यासारखीच त्यांची कथा आहे.

प्रत्येक लेख हा अभ्यापूर्ण आहेच तसेच तो वाचकालाही विचार करण्यास लावणारा आहे. प्रत्येक गोष्टींवरची बोकिलांची निरिक्षणे आणि टिपणे आपल्याला पूर्ण पटतात. वसंत पळशीकर यांनी पुस्तकाला लिहिलेली प्रस्तावना तर पुस्तकातील अजून एक लेख होऊ शकेल. प्रत्येक लेखाचे मार्मिक परिक्षण प्रस्तावनेत केले आहे.


खूपच उत्तम पुस्तक आहे. नक्की मिळवून वाचा. मला हे पुस्तक वाचण्यास दिल्याबद्दल सलील चे आभार !

3 प्रतिक्रिया:

Praj ~ said...

mala pahije.. mala pahije...

Akshay Sumant said...

फारच चांगला परिक्षण लिहिला आहेस. आता पुस्तक वाचण्याची उत्सुकता आहे. :)मला माहित नव्हता की बोकिल गंभीर लेखन पण करतात. नक्की वाचणार.

Potter said...

@praju:salil la courier karayla sangtoy me.. gela tujha chance :P