4

TEDx @ पुणे

TEDx चा कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यासाठी स्वयंसेवकांचा एक गट स्थापन करण्यात आला आहे. जागतिक दर्जाचा कार्यक्रम करण्यसाठी आम्हांस स्वयंसेवकांची गरज आहे. कृपया TEDx च्या mailing list चे सदस्य होवून आम्हाला मदत करा. प्रकल्प आरंभाची सभा शानिवारी २७ फेब्रुवारी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत SICSR (Symbiosis Institute of Computer Studies and Research, Model Colony. नकाशा ) होईल . कृपया सभेस या. सभेस कोणीही हजर राहू शकतो. सभा नि:शुल्क आहे.

TEDx बद्दल थोडेसे :सेन्धील मुल्लैनाथान यांचा हा TED वरील व्याख्यानाचा हा video आहे. "आपण साध्या समस्या उपाय माहीत असूनदेखील कश्या सोडवू शकत नाही ?" या विषयावरचे हे भाषण बघून आपणांस TED वरील भाषणांची कल्पना येईल. प्रणव मिस्त्रीचा हा Sixth sense technology चा video तर आपण बघितलाच असेल.

TEDx हि TED ची स्थानिक पातळीवरील आवृत्ती आहे. तुम्हाला TED बद्दल माहिती असेल किंवा TED चे काही videos आपण बघितलेही असतील. TED हि ना-नफा तत्वावर काम करणारी एक संघटना आहे. प्रेरणादायी कल्पना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या संघटनेतर्फे जगभरात विविध ठिकाणी व्याखानसत्रे आयोजित केली जातात. एखाद्या कल्पनेत असणाऱ्या जग बदलण्याच्या शक्तीवर TED चा विश्वास आहे. म्हणूनच TED उत्कृष्ठ विचार असलेल्या कल्पना भाषणांच्या स्वरुपात एकत्र करत आहे. आणि या भाषणांचे video सगळ्यांसाठी उपलब्ध आहेत. TED हे "Technology, Entertainment and Design" चे लघुरूप आहे. पण आता जगाला बदलून टाकणारी कोणतीही कल्पना TED मध्ये समाविष्ट होते.

TEDx हे TED च्या मानांकनानुसार भरणारे स्थानिक पातळीवरील व्याखानसत्र आहे. अर्ध्या किवा पूर्ण दिवसाच्या या कार्यक्रमात निमंत्रित, काळजीपूर्वक निवडलेल्या लोकांची व्याखाने होतात. कोणतेही व्याखान १८ मिनिटांपेक्षा जास्त कालावधीचे नसते. विषय वेगवेगळ्या क्षेत्रातील असतात. कार्यक्रमात फक्त व्याखाने असतात. इतर काही नाही. आणि ही व्याखाने खरोखर सुंदर असावीत आमची इच्छा आहे. व्याखाने जी श्रोत्यांना विचारमग्न किंवा अचंबित करतील !

माझी खात्री आहे कि पुण्यात अश्या बऱ्याच व्यक्ती आहेत. त्यांना शोधण्यासाठी आम्हाला तुमची गरज आहे. जयंत नारळीकर, अरविंद गुप्ता यांसारख्या प्रसिद्ध व्यक्ती संभावित वक्त्यांच्या यादीत आहेत. यांना बोलावण्याचा प्रयत्न आम्हीच करूच, पण याच बरोबर, तरुण, फारश्या प्रसिद्ध नसलेल्या पण पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरू शकतील अश्या कल्पना असणाऱ्या वक्त्यांची आम्हाला गरज आहे.

असे वक्ते शोधण्यास आम्हास मदत करणार ना ? तर मग, २७ तारखेच्या सभेला या. आणि TEDxPune group चे सदस्य व्हा. (किंवा TEDxPune ला Twitter वर follow करा.)


[Punetech वरील या लेखाचा अनुवाद करण्याचा मी प्रयत्न केला आहे . आहे. एकाद्या इंग्रजी लेखाचे मराठीत भाषंतर करण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.]
9

अमेरिकेचे अध्यक्ष अतिरेक्याकडून झालेल्या गोळीबारात ठार

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आज संध्याकाळी अतिरेक्याकडून झालेल्या गोळीबारात ठार झाले. ओसामा नावाच्या अतिरेक्याने केलेल्या बेछुट गोळीबारीत ते जागच्या जागी मरण पावले. "तुझे नाव ओसामा आहे आणि तू अतिरेकी आहेस" हे त्यांचे अखेरचे शब्द होते.

ओसामा गेल्या महिन्यापासूनच चर्चेत होता. अमेरिकेच्या विमानतळावर उतरल्यापासूनच त्याचे वागणे वेगळे होते. समोरचा माणूस अस्वस्थ होईपर्यंत त्याच्याकडे एकटक बघण्याचा विचित्र आजार त्याला होता. अमेरिकन विमानांनी पाकिस्तानात केलेल्या हल्ल्यात आई मरण पावल्यावर तो आपल्या मोठ्या भावाकडे राहण्यासाठी आला होता. विमानतळावर तपासणी चालू असतानाच त्याने अमेरिकेच्या अध्यक्षांना भेटण्याचे मनसुबे जाहीर केले होते. "माझे नाव ओसामा आहे आणि मी अतिरेकी आहे." हा निरोप त्याला अध्यक्षांना सांगायचा होता. हातात मशीनगन घेवून तो मधून मधून "शुटींग" करत असे. "सगळे मुसलमान अतिरेकी नसतात" असे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकांवर तर तो फारच चिडत असे.

"मी अतिरेकी आहे" अशी कबुली दिल्यामुळे त्याला तुरुंगात टाकण्यात आले होते. पण ही घटना अभूतपूर्व असल्याचे विविध वृत्तवाहिन्यांनी जाहीर केले. खरा अतिरेकी कधी अशी कबुली देत नाही असे वारंवार सांगून त्यांनी सरकारवर त्याला सोडण्यासाठी दबाव आणला होता. "ओसामा खरच अतिरेकी आहे का ?" यावर एक sms contest सुद्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात ९० % लोकांनी तो अतिरेकी वाटत नसल्याचे सांगितल्यामुळे त्याची सुटका झाली होती. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने sms पाठवणा~यांचे आभार मानून अमेरिकेच्या अध्यक्षांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. ज्या अतिरेक्यांविरुद्ध अमेरिका लढत आहे ते अतिरेकी नक्की आहेत तरी कसे हे जाणून घेण्यासाठी अध्यक्षांनी आपल्यासोबत एखादी बियर पार्टी आयोजित करावी अशी सूचना त्याने केली होती. "I can screw up almost anything" असा बोर्ड घेवून तो दारोदार भटकत होता.

अखेरीस ओबामांनी त्याला भेटायचे मान्य केले. आज संध्याकाळी त्यांची भेट एका पटांगणात झाली. दोघांचेही समर्थक मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर होते. हातमिळवणी आणि बियरची १-१ बाटली झाल्यावर ओबामांनी "तुझे नाव ओसामा आहे आणि तू अतिरेकी आहेस" अशी घोषणा केली. त्यावर प्रतिकिया म्हणून ओसामाने हातातल्या बंदुकीने ओबामांवर गोळ्यांचा वर्षाव केला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, बियरमध्ये काहीतरी मिसळलेले असावे असा अंदाज विरोधी पक्षाने व्यक्त केला आहे.

"मी अमेरिकेचा अध्यक्ष झालो तर अतिरेक्यांसोबतचेच नव्हे तर सर्वच ठिकाणाचे युद्ध संपवीन आणि मगच नोबेल पारितोषिक स्वीकारीन" अशी घोषणा ओसामाने केली आहे. त्याला हंगामी अध्यक्ष बनवण्याच्या जोरदार हालचाली चालू आहेत.

ओबामांचा अंत्यसंस्कारविधी उद्या पार पडेल.

[संपूर्ण काल्पनिक ]

3

समुद्रापारचे समाज

"शाळा"चे लेखक म्हणून मिलिंद बोकील आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आहेत. त्यांची "झेन गार्डन" वगळता इतर पुस्तके मी वाचली नव्हती. काही दिवसापूर्वीच त्यांचे समुद्रापारचे समाज हे पुस्तक वाचले आणि मी भारावून गेलो.

देशोदेशीच्या वेगवेगळ्या समाजांवर लिहिलेले हे लेख आहेत. पण हे नुसतेच प्रवासवर्णन नाही. तर विकास, समृद्धी, संस्कृती, जागतिकीकरण, जातीव्यवस्था या विषयांवरचे आपले पूर्वग्रह हलवण्याचे काम हे लेख करतात.

उत्तर फिलिपीन्सच्या इफूगाओ प्रांतातले आदिवासी, बैरॉईटमधील एक समाजकार्य करणारा समूह, कोस्टा रिका मधील जंगल पर्यटन, ऍमस्टरडॅम आणि थायलंडमधील देहविक्री, वर्णभेदाने दुभंगलेला झिम्बाब्वे, जपानमधले दलित, नैसर्गिक शेती करणारे ब्राझील मधील शेतकरी असे अनेक विषय मिलिद बोकील यांनी हाताळले आहेत. प्रत्येक ठिकाणच्या व्यवस्थेची आपल्या समाजव्यवस्थेची तुलनाही केली आहे.

"माबुहाय इफ़ुगाओ" या लेखात तथाकथित मागासलेल्या आदिवासींच्या समृद्ध जीवनपद्धतीबद्दल ते सांगतात. निसर्गाचा कमीत कमी नाश करून, परस्परांस मदत करून, पाश्चिमात्य विकासवाद्यांच्या आक्रमणाला तोंड देत आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न त्यांनी मांडला आहे.
"बैरॉईटचे मित्र" या लेखात बोकीलांनी बैरॉईटमधील एका समाजकार्य करणाऱ्या समूहाची ओळख करून दिली आहे. त्यांच्यातील एका सोबत झालेले बोकीलांचे तात्विक संभाषण त्यांनी दिले आहे. ते अंतर्मुख करणारे आहे.
"कोस्टा रिका" मध्ये कोस्टा रिकातील जंगल पर्यटन, परराष्ट्रीय कंपन्याच्या हाती असलेला तिथला कारभार आणि त्याचा निसर्गावर, तिथल्या स्थानिक लोकांवर होणारा परिणाम यावर बोकील भाष्य करतात.
"ऍमस्टरडॅम" आणि "अमेझिंग थायलंड" या लेखात लैंगिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असेलेल्या ऍमस्टरडॅम आणि थायलंड या ठिकाणच्या लैंगिक शोषणाबद्दल लिहिले आहे. बाजारीकरण, जागतिकीकरण याच्या नावाखाली प्रस्थापित होणाऱ्या उपभोगवादी बाजारू व्यवस्थाचे दर्शन आपल्याला घडते.
"झिम्बाब्वे : गोरा आणि काळा' आणि 'जपानमधील दलित' या लेखांमध्ये हीन समजल्या जाणार्‍या समाजघटकांबद्दल बोकीलांनी लिहिले आहे. वसाहतवादामुळे झिम्बाब्वेतील काळ्या लोकांची, तसेच जपान मधील "बुराकू" समुदायाची स्थिती त्यांनी मांडली आहे. एकाद्या घटकाला हीन ठरवणे, त्याच्या प्रगतीच्या वाट बंद करणे हे सर्वत्र कसे सारखे आहे हे या लेखांत विस्ताराने सागितले आहे.
"जागे झाले ब्राझिलचे शेतकरी" या शेवटच्या लेखात नैसर्गिक शेतीकडे वळलेल्या ब्राझील मधील शेतकऱ्यांची कथा आहे. भारतीय शेतकऱ्यांनी बोध घेण्यासारखीच त्यांची कथा आहे.

प्रत्येक लेख हा अभ्यापूर्ण आहेच तसेच तो वाचकालाही विचार करण्यास लावणारा आहे. प्रत्येक गोष्टींवरची बोकिलांची निरिक्षणे आणि टिपणे आपल्याला पूर्ण पटतात. वसंत पळशीकर यांनी पुस्तकाला लिहिलेली प्रस्तावना तर पुस्तकातील अजून एक लेख होऊ शकेल. प्रत्येक लेखाचे मार्मिक परिक्षण प्रस्तावनेत केले आहे.


खूपच उत्तम पुस्तक आहे. नक्की मिळवून वाचा. मला हे पुस्तक वाचण्यास दिल्याबद्दल सलील चे आभार !