7

झेंडा

अवधूत गुप्ते चित्रपट काढणार हे ऐकून माझ्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. तो राजकारणावर चित्रपट काढणार आहे हे कळल्यावर आणि चित्रपटातील "विठ्ठला" आणि "पत्रास कारण की" ही गाणी ऐकून तर उत्सुकता अजून वाढली होती. पण झेंडा बघून माझ्या अपेक्षा साफ धुळीस मिळाल्या.

शिवसेना-मनसे च्या कलहाच्या पार्श्वभूमीवर समाजातील ४ वेगवेगळ्या स्तरावरील तरुणांची ही कथा आहे. कथेला सुरुवात होते तेंव्हा काकासाहेब सरपोतदार आपल्या "जनसेना" या पक्षाचा उत्तराधिकारी म्हणून मुलगा उमेश याची निवड करतात. यामुळे निराश होवून त्यांचा पुतण्या राजेश सरपोतदार "महाराष्ट्र साम्राज्य सेना" या नावाचा स्वत:चा वेगळा पक्ष काढतो.

आदित्य महाजन हा एका event management कंपनीतील तरुण. नितीमुल्ये वगैरे फारसे न मानणारा. राजेश सरपोतदार यांच्या सभेच्या आयोजनाच्या निमित्ताने तो त्यांच्या संपर्कात येतो आणि मग हळूहळू त्यांच्याकडून अधिकृत, अनधिकृत कामे करून शेवटी सर्वच पक्षाच्या नेत्याची सर्व प्रकारची कामे करणारा दलाल बनतो.
उमेश जगताप हा हिंदुत्ववादी तरुण राजेश सरपोतदार यांच्या सोबत त्यांच्या नवीन पक्षात जातो. राजेश सरपोतदार यांनी सत्ता मिळवण्यासाठी केलेल्या तडजोडी बघून व्यथित होवून शेवटी अमेरिकेला जातो.
संतोष शिंदे हा उमेशचा मित्र. काकासाहेबांशी एकनिष्ठ राहून तो जनसेनेतच राहतो. पण उमेश सरपोतदार यांनी पक्ष टिकवून ठेवण्यासाठी आखलेल्या नवीन धोरणांनी निराश होतो.
अविनाश मोहिते या कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसनिष्ठ घराण्यात वाढलेला तरुण. सत्तेसाठी तो जनसेनेतून साम्राज्य सेनेत येतो. जिल्हा परिषद, आमदार, खासदार असा मार्ग मनाशी पक्का असलेला तरुण. निवडणुकीच्या वेळी दुसऱ्या पक्षातुन आलेल्या एका पैसेवाल्या उद्योगपतीला तिकीट दिल्यावर चिडून तो राजकारण सोडतो.

मग मला हा चित्रपट का आवडला नाही ?

चित्रपटातील बहुतांश व्यक्तिरेखा मला अवास्तव, उथळ वाटल्या. चित्रपटात नेते स्वत:च्या स्वार्थासाठी कोणतेही निर्णय घेतात(हे खरे आहे !) आणि कार्यकर्ते अजिबात विचार न करणारे, नेत्याच्या एका निर्णयावर टोकाचे पाऊल उचलणारे दाखवले आहेत.

आदित्य महाजन हे पात्र जरा वास्तववादी आहे. अश्या प्रकारचे दलाल राजकारणात आधीपासून आहेत आणि राहतील. वास्तव जीवनात नेत्यांची कामे करण्याबरोबरच हे लोक बिल्डर बनून कंत्राटे सुद्धा घेतात. तेवढीच जास्त कमाई !
उमेशला महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रासाठी काहीतरी करायचे असते. पैसा, राजकारणाची अक्कल, अनुयायी यापैकी काही नसताना तो राजेश सरपोतदार यांच्या एवढ्या जवळ कसा असतो हे शेवटपर्यंत कळत नाही. राजेशने सत्तेसाठी मुस्लिमांचे साहाय्य घेण्याचे ठरवल्यावर तो बिथरतो आणि थेट अमेरिका गाठतो. अमेरिकेत त्याच्या मामाचा मित्र त्याला काम देणार असतो म्हणे. मुंबईत काम देतो म्हणाले असते तर एक वेळ ठीक होते. आणि देश सोडून का जावे ? राजकारण सोडून दुसरे काही करता येत नाही महाराष्ट्रासाठी ?

संतोष हा जनसेनेसाठी मारामारी करणार शाखाप्रमुख. तो स्वत:ची वडापाव ची गाडी टाकतो, ते सुद्धा कोणतीही परवानगी न घेता. आणि मग ती गाडी अतिक्रमण विभागाने उचलून नेताना तो आईसोबत रडतो, शिपायांच्या पाया पडतो."मराठी माणसांचा धंदा बंद करू नका" असे गयावया करतो. पोलीस स्टेशनात त्याला हवालदार पण हाकलून देतो. अरे ? पोलीस ठाण्याच्या मुख्य पोलिसाची त्याची एवढी मैत्री असते तर गाडी उचलल्यावर सगळ्यांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन का बदलतो ? पुण्यात अतिक्रमण विभागाने कारवाई केल्यावर २ तासांच्या आत पुन्हा त्याच जागेवर तात्पुरत्या टपऱ्या उभ्या राहताना मी बघीतल्या आहेत आणि माझी खात्री आहे कि सगळीकडे असेच होत असणार. आणि ती गाडी अधिकृतपणे २ दिवसांनी मिळणार असते. मग ती मिळाल्यावर तो रीतसर परवानगी (परवानगी देणारे त्याच्या खास ओळखीचेच असतात) का काढत नाही ? सगळे राजकारण सोडून देण्याच्या गोष्टी करतो. शेवटी तो रिक्षा चालवताना दाखवला आहे. आणि त्याची बहिण एक टपरी चालवत असते. (ही टपरी तरी अधिकृत आहे का ?) या टपरीवर तो उभा असताना राडा चालू झाल्याचे कळते आणि तो काठ्या घेवून मारामारीला निघतो पण बहिणीच्या भाषणानंतर त्याचे मतपरिवर्तन होते आणि तो काठ्या घेवून भांडणे थांबवायला निघतो.

अविनाश हा साम्राज्य सेनेचा जिल्हाप्रमुख असतो. पण तसे वागताना तो कुठे दिसत नाही. राजेश सरपोतदार यांच्या सभेच्या आयोजनाच्या निमित्ताने कोल्हापुरात आदित्यच्या कंपनीतील इतर सहकारी येतात. त्यातील एका मुलीसमोर तो १-२ वाक्ये इंग्रजीतून बोलतो आणि ती प्रचंड impress होते. मग त्यांची मैत्री होते. ती त्याला राजकारणापेक्षा नोकरी चांगली कशी हे पटवून देते. पण त्या वेळी त्याचा राजकारणाचा मार्ग पक्का असतो. निवडणुकीच्या वेळी दुसऱ्याला तिकीट मिळाल्यावर हा माणूस राजकारण सोडून नोकरी धरतो आणि ६ महिन्यांत त्या मैत्रिणीचा बॉस बनतो. माझ्या माहितीत तरी एकवेळचे तिकीट मिळाले नाही म्हणून राजकारण सोडणारा माणूस नाही. आणि "माझा राजकारणाचा मार्ग पक्का आहे" वैगेरे बात करणाऱ्या तरुणाकडून हे अपेक्षित नाही.

चित्रपटातून "राजकारण वगैरे काही करू नका. ते वाईट असते. त्यापेक्षा फक्त स्वत:ची नोकरी करा" हा जो संदेश मिळतो तो चुकीचा आहे. राजकारण एवढेही वाईट नाही. आणि स्वत:चा धंदा/नोकरी सांभाळून सुद्धा राजकारण करता येतेच की !


चित्रपटातील मला विनोदी वाटलेले काही प्रसंग/संवाद -
१) " Friends ?" - अविनाशने १-२ वाक्ये इंग्रजीतून बोलल्यावर त्या मुलीने " Friends ?" असे म्हणून त्याच्यासमोर पुढे केलेला हात.
२) "जर तू पदवीधर आहेस तर तू राजकारण का करतोस ? शहरात जावून नोकरी का करत नाहीस ?" अविनाशला त्या मुलीने विचारलेला प्रश्न.
३) सभेच्या आयोजनासाठी आलेल्या मुलींपैकी एक मुलगी उन्हामुळे बेशुद्ध पडते तेंव्हा आकाशात सर्वत्र ढग दिसत असतात.
४) शेवटच्या प्रसंगामध्ये, उमेश अमेरिकेत असताना त्याच्या खिडकी बाहेर दिसणारा स्वातंत्रदेवीचा पुतळा.
५) Rock style ने काळे कपडे घालून नाचणारा, गाणारा अवधूत गुप्ते. स्वत:चा चित्रपट आहे म्हणून हे शक्य झाले असावे.

संपूर्ण चित्रपटात "विठ्ठला" हे गाणेच आवडले फक्त मला. "चालतं चालतं , चित्रपट आहे !" असे म्हणून चित्रपट पाहण्याचा खूप प्रयत्न केला पण तरीही चित्रपटात घडणाऱ्या गोष्टी पटल्या नाहीत.

7 प्रतिक्रिया:

विक्रम एक शांत वादळ said...

गाणी ऐकून तर उत्सुकता अजून वाढली होती. पण झेंडा बघून माझ्या अपेक्षा साफ धुळीस मिळाल्या.
+1

Chetan Vaishampayan said...

Nashib mi 'Zenda' nahi baghitala.....
Pan asude 1, 2 chnagale chitrapat ale astana Marathi madhe asa ek tari ( Chitrapatacchya addhichya prasidhdhi mule) Gajalela chitrapat ala tar ya bakichyaa Marathi chtrapatanna Drushta lagnar nahi..yache samadhan vatate.. Congrates to all Marathi Cinema and Actors..(of Natranga,S A Gho, Jogava, Hari... Factory). Prasidhidhi kashihi milali tari tyamule navin cinema ala ahe he tari lokkanchya lakshat yete ( nidan maharashtrachya baherchya)....

अभिजीत said...

विक्रम,
प्रतिक्रियेबद्दल आभार !, माझ्यासारखा कोणीतरी आहे हे बघून आनंद झाला.

चेतन,
मराठीत सध्या चांगले चित्रपट येत आहेत हि खरीच चांगली गोष्ट आहे.

Salil said...

mazhya mate ha chitrapat complete wedepaNa ahe - ugachach maharashtrachi nadi pakadNara wagaire aaw aaNun thakarey gharaNyachi bhandaNa chavhatyawar aNun, atishay uthaL aNi batbateet charachers gheun kadhalela ek sawaLa gondhaL ahe - na tyala kahi sutsutit kathanak na kahi goshticha tartamya - aso je ahe te ahe - je jhala te jhala <:-)

Nakul said...
This comment has been removed by the author.
Nakul said...

१ विचार असाही
वर नमूद केलेल्या सगळ्या गोष्टी मान्य १ उत्तम परीक्षण
भारतीय चित्रपटसृष्टीत काही मोजके अपवाद वगळता पूर्णपणे २ किंवा 3 तास उत्तम कथा सांगण हे अवघड मुळात.....त्यामुळे त्यात स्वतःच्या डोक्यातला मसाला टाकून प्रेक्षकाच्या मनात जाताना चुटपूट लाऊन जाण.....
१ उत्तम नमुना म्हणजे ३ इडीअटस मध्ये असलेला रंचो चा ज्ञान दाखवण्याकरता टाकण्यात आलेला pregnancyचा प्रसंग...
सांगण्याचा हेतू एवढाच कि ३ तास लोकांची करमणूक करण्याकरता चित्रपटात काही गोष्टी किंवा काही प्रसंग मुद्दामून केले जातात.
जसे ते झेंडा मध्ये पण आहेत पण तरीही हा चित्रपट काही गोष्टी वर उजेड टाकतो .....
मुळात राजकारणात सामान्य कार्यकर्त्यांची अवस्था आणि किंमत काय असते...
मला आवडलेलं काही प्रसंग...
मुळात चित्रपटाचा एंड उत्कृष्ट.....
*संतोष राडा थांबवायला जात असताना मागे फडकत असलेला 'झेंडा'..............."तिरंगा"....
*कॉर्पोरेट जगात राजकारणावर काय आणि कसा विचार केला जातो हे दाखवण्याचा १ यशस्वी प्रयत्न...."हे सगळे लोकांना ******* बनवण्याचे धंदे आहेत...
आणि त्यातलाच १ प्रोट्यागोनिसट राजकारणात असलेल्या परिस्थितीचा फायदा करून घेऊन सत्तेच्या आणि सक्सेसच्या पायरया कशा चढतो हे दाखविण्याचा १ प्रयत्न....
*कुणाच्या तरी सांगण्यावरून आजपर्यंत खूप राडे केले...साला झेंडा कुठला पण असो मारणारा पण कार्यकर्ता आणि मार खाणारा पण कार्यकर्ताच नेते नाहीत.....
* then what do u think politics is? politics हे मजबूत प्रोफिट मिळवण्याचा धंदा आहे....
मुळात हा चित्रपट मलातरी वास्तववादी वाटला....
संदेश चुकीचा होता हे मान्य कि राजकरणात पडूच नये आणि सरळ आपली नोकरी करावी...
पण संतोष ह्या तरुणाला "काम" करून ४ पैसे कमवण्यापेक्षा शाखाप्रमुख बनून राडे करण्यामध्ये असलेला इंटरेस्ट आणि त्याचायात नंतर झालेला बदल....
Kudos 2 avdhut gupte सामान्य कार्यकर्त्यांची कथा सांगण्याचा प्रयत्न केल्याबद्दल....

अभिजीत said...

नकुल,

तुम्हाला चित्रपट आवडला, तुमच्या मताचा मी आदर करतो. शेवटचा प्रसंग खरच चांगला आहे. पक्षाच्या झेंड्यापेक्षा देशाचा झेंडा कधीही महत्वाचा आहे. तोच हाती घ्यावा. पण संतोष काठ्या घेवून भांडणे मिटवायला जातो हे पटत नाही. मला वाटले कि तो भांडणे मिटवायला जातो आणि तिथेमरतो असे दाखवतील.