13

पुणेरी नजरेने पुण्यातील वाहतूक

एका पुणेकराची "पुण्यातील वाहतूक" या विषयावर घेतलेली ही मुलाखत.

१) तुम्ही कोणते वाहन चालवता ?
पुणेकर - कोणते वाहन चालवतो हे फारसे महत्वाचे नाही. पुलंनी सांगितल्याप्रमाणे पुण्यात कोणतेही वाहन चालवणे म्हणजे हत्यार चालवण्यासारखेच आहे.

२) पुण्यातील वाहतुकीची समस्या एवढी गंभीर होत आहे. पुणे आता देशातील सर्वाधिक दुचाकींचे शहर म्हणून ओळखले जाते. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते ?
पुणेकर - आम्हा पुणेकरांना प्रत्येक गोष्टीबाबत काहीतरी वेगळे वाटत असते असे तुम्हाला का वाटते ? काहीही वाटत नाही, सकाळ संध्याकाळ रस्त्यावर असताना लोकांना, सरकारला शिव्या देत जायचे आणि घरी आल्यावर सगळे विसरायचे. बास !

३) वाहतुकीच्या समस्येबद्दल पुण्याबाहेरून आलेले लोक जबाबदार आहेत असे तुम्हाला वाटते का ?
पुणेकर - आम्ही आतले, बाहेरचे असा भेदभाव करत नाही. कोण गाडी चालवत आहे, यावर आपला टोमणा ठरतो. तरुण मुलगा असेल तर, "बापाच्या पैशावर मजा मारतात साले", तरुणी/बाई असेल तर, "या बायकांना जन्मात गाडी चालवता येणार नाही.". म्हातारा(५५+) मनुष्य असेल तर, "या वयात झेपत नसताना गाडी चालवायची कशाला ?" असा शेरा तयार असतो.

४) वाहतूक सुरळीत होण्यासाठी वाहतूक विभाग निरनिराळ्या योजना आखत असते. त्याचा काही फायदा होतो असे तुम्हाला वाटते का ?
पुणेकर - वाहतूक विभागाच्या तथाकथित योजना मी फक्त वर्तमानपत्रात वाचतो. मोठा गाजावाजा करून असल्या योजना सुरु करतात. खुद्द रस्त्यावर काही दिसत नाही. चौकातील कॅमेरे चालू नसतात. रेल्वे स्थानकावर प्रीपेड रिक्षा नसतात. आपण काहीतरी योजना आखतोय असे दाखवणे हे त्यांचे काम आहे. ते करतात. करू दे.

५) महानगरपालिका वाहतुकीसाठी काही करते का ?
पुणेकर - महानगरपालिका फक्त रस्ते खोदते आणि वाहतुकीची समस्या वाढवते. सांगितलेल्या वेळेत रस्ता कधीच कसा पूर्ण होत नाही ? महानगरपालिकेने वाहतूकीबाबत केलेला सर्वात मोठा विनोद म्हणजे बी.आर.टी. असावा. या योजनेत त्यांना नक्की काय करायचे आहे, हे त्यांना तरी ठावूक आहे का ?

५) जर महानगरपालिका काही करत नाही, तर तुम्ही महानगरपालिकेतील सत्ता बदलत का नाही ?
पुणेकर - तुम्ही वाहतुकीबद्दल मुलाखत घेत आहात ना, मग वाहतुकीबद्दल बोला, उगाच राजकारणात घुसू नका.

६) वाहन चालवणाऱ्या इतर लोकांबद्दल आपल्याला काय वाटते ?
पुणेकर - ती माझ्यासारखीच माणसे आहेत. एखादा माणूस कोणते वाहन चालवतो यावर त्याच्याबद्दलचे मत ठरते. चारचाकीवाले पैशाचा माज असलेले असतात. दुचाकीवाले उगीच भाव खाणारे आणि जमेल तेथे घुसणारे असतात. रिक्षावाले अडाणी, भांडखोर असतात. पादचाऱ्यांना कसे चालावे ते समाजात नाही. पी.एम.टी. च्या वाहनचालकांद्दल तर बोलायलाच नको. वाहन चालवणाऱ्या सगळ्यांना रस्ता आपल्या बापाचाच आहे असे वाटत असते.

७) वाहतूक विभागातील पोलिसांबद्दल आपणास काय वाटते ?
पुणेकर - पोलिसांबद्दल कोण चांगले बोलतो का ? मला वाटते फक्त गृहमंत्रीच पोलिसांबद्दल चांगले बोलत असावेत. पोलीस म्हणजे पैसे खाणारे, एवढेच आम्हाला कळते.

८) वाहतुकीच्या कायद्यांबद्दल जागृती नाही म्हणून असे घडत आहे का ?
पुणेकर - पुण्यातील वाहतुकीचे कायदे हे relative असतात. तुमच्या गाडीला कोणाची धडक बसली आहे कि तुम्ही कोणाला धडकला आहात, यावर कायदे ठरतात. इथल्या वाहतुकीत सगळे relative असते. समोरच्याला पिवळा सिग्नल असतान आपण गाडी पुढे नेतो. "२ सेकंदच तर आधी निघतो आहे. त्यात एवढे काय" असे आपल्याला वाटते. समोरचा माणूस पण असाच विचार करतो आणि २ सेकंद उशिरा निघतो. हे मात्र आपल्याला चालत नाही.

९) या वाहतुकीमुळे काही फायदा होतो का ?
पुणेकर - आता घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी चांगले शोधायचे. सिग्नल पलीकडील झाडामागचा पोलीस शोधताना नजर तीक्ष्ण होते.पोलिसांनी पकडल्यावर वाटाघाटींमध्ये आपण तरबेज होतो. पोलींसमोर रडवेला चेहरा करताना अभिनयकौशल्य सुधारते. भांडण करताना जरी आपलीच चूक असली तरी भांडून वाद विवादाची तयारी होते. एफ. एम. वाल्यांना वाहतुकीवर कार्यक्रम करता येतात. असे बरेच फायदे शोधता येतील.

१० ) या नवीन वर्षात तुम्ही पुणेकरांना काही संदेश द्याल का ?
पुणेकर - काहीही करा, फक्त माझ्या गाडीखाली येवू नका. बाकी पुणेकर सुज्ञ आहेतच.

हि मुलाखत पूर्णपणे काल्पनिक आहे. हे सुज्ञ वाचकांनी ओळखले असेलच.

13 प्रतिक्रिया:

Sandeep said...

loved 5 :) Vahatuki baddal bola.. Rajkaranat ghusu naka :D

Praj ~ said...

lolzz.. ek number..
#9 :)

Potter said...

काहीही करा, फक्त माझ्या गाडीखाली येवू नका
So true !! hehe
good one

Salil said...

heeheeee khatarrrnaaak bhaarriii!!
:)

nivaantharshad said...

पुण्यातील वाहतुकीचे कायदे हे relative असतात
agdi kharay!!

अन्तरात्मन् said...

Ultimate

alhadmahabal said...

छान!

kayvatelte said...

.. मस्त जमलंय..

Darth Chatri said...

हि मुलाखत नक्की काल्पनिक आहे का? :)

Abhijit said...

संदीप, प्रज्वलीत, सलील, हर्षद, अन्तरात्म अल्हाद्म्हाबळ , महेंद्र काका,

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

Darth Chatri
याचे उत्तर देणे कठीण आहे :P

'Bade mian' said...

Can you translate in Hindi / English as well for the new Puneikars !

chetan said...

varchya commentla kahi uttar dyaave ka?

Rohit said...

lai bharri!!!