7

झेंडा

अवधूत गुप्ते चित्रपट काढणार हे ऐकून माझ्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. तो राजकारणावर चित्रपट काढणार आहे हे कळल्यावर आणि चित्रपटातील "विठ्ठला" आणि "पत्रास कारण की" ही गाणी ऐकून तर उत्सुकता अजून वाढली होती. पण झेंडा बघून माझ्या अपेक्षा साफ धुळीस मिळाल्या.

शिवसेना-मनसे च्या कलहाच्या पार्श्वभूमीवर समाजातील ४ वेगवेगळ्या स्तरावरील तरुणांची ही कथा आहे. कथेला सुरुवात होते तेंव्हा काकासाहेब सरपोतदार आपल्या "जनसेना" या पक्षाचा उत्तराधिकारी म्हणून मुलगा उमेश याची निवड करतात. यामुळे निराश होवून त्यांचा पुतण्या राजेश सरपोतदार "महाराष्ट्र साम्राज्य सेना" या नावाचा स्वत:चा वेगळा पक्ष काढतो.

आदित्य महाजन हा एका event management कंपनीतील तरुण. नितीमुल्ये वगैरे फारसे न मानणारा. राजेश सरपोतदार यांच्या सभेच्या आयोजनाच्या निमित्ताने तो त्यांच्या संपर्कात येतो आणि मग हळूहळू त्यांच्याकडून अधिकृत, अनधिकृत कामे करून शेवटी सर्वच पक्षाच्या नेत्याची सर्व प्रकारची कामे करणारा दलाल बनतो.
उमेश जगताप हा हिंदुत्ववादी तरुण राजेश सरपोतदार यांच्या सोबत त्यांच्या नवीन पक्षात जातो. राजेश सरपोतदार यांनी सत्ता मिळवण्यासाठी केलेल्या तडजोडी बघून व्यथित होवून शेवटी अमेरिकेला जातो.
संतोष शिंदे हा उमेशचा मित्र. काकासाहेबांशी एकनिष्ठ राहून तो जनसेनेतच राहतो. पण उमेश सरपोतदार यांनी पक्ष टिकवून ठेवण्यासाठी आखलेल्या नवीन धोरणांनी निराश होतो.
अविनाश मोहिते या कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसनिष्ठ घराण्यात वाढलेला तरुण. सत्तेसाठी तो जनसेनेतून साम्राज्य सेनेत येतो. जिल्हा परिषद, आमदार, खासदार असा मार्ग मनाशी पक्का असलेला तरुण. निवडणुकीच्या वेळी दुसऱ्या पक्षातुन आलेल्या एका पैसेवाल्या उद्योगपतीला तिकीट दिल्यावर चिडून तो राजकारण सोडतो.

मग मला हा चित्रपट का आवडला नाही ?

चित्रपटातील बहुतांश व्यक्तिरेखा मला अवास्तव, उथळ वाटल्या. चित्रपटात नेते स्वत:च्या स्वार्थासाठी कोणतेही निर्णय घेतात(हे खरे आहे !) आणि कार्यकर्ते अजिबात विचार न करणारे, नेत्याच्या एका निर्णयावर टोकाचे पाऊल उचलणारे दाखवले आहेत.

आदित्य महाजन हे पात्र जरा वास्तववादी आहे. अश्या प्रकारचे दलाल राजकारणात आधीपासून आहेत आणि राहतील. वास्तव जीवनात नेत्यांची कामे करण्याबरोबरच हे लोक बिल्डर बनून कंत्राटे सुद्धा घेतात. तेवढीच जास्त कमाई !
उमेशला महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रासाठी काहीतरी करायचे असते. पैसा, राजकारणाची अक्कल, अनुयायी यापैकी काही नसताना तो राजेश सरपोतदार यांच्या एवढ्या जवळ कसा असतो हे शेवटपर्यंत कळत नाही. राजेशने सत्तेसाठी मुस्लिमांचे साहाय्य घेण्याचे ठरवल्यावर तो बिथरतो आणि थेट अमेरिका गाठतो. अमेरिकेत त्याच्या मामाचा मित्र त्याला काम देणार असतो म्हणे. मुंबईत काम देतो म्हणाले असते तर एक वेळ ठीक होते. आणि देश सोडून का जावे ? राजकारण सोडून दुसरे काही करता येत नाही महाराष्ट्रासाठी ?

संतोष हा जनसेनेसाठी मारामारी करणार शाखाप्रमुख. तो स्वत:ची वडापाव ची गाडी टाकतो, ते सुद्धा कोणतीही परवानगी न घेता. आणि मग ती गाडी अतिक्रमण विभागाने उचलून नेताना तो आईसोबत रडतो, शिपायांच्या पाया पडतो."मराठी माणसांचा धंदा बंद करू नका" असे गयावया करतो. पोलीस स्टेशनात त्याला हवालदार पण हाकलून देतो. अरे ? पोलीस ठाण्याच्या मुख्य पोलिसाची त्याची एवढी मैत्री असते तर गाडी उचलल्यावर सगळ्यांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन का बदलतो ? पुण्यात अतिक्रमण विभागाने कारवाई केल्यावर २ तासांच्या आत पुन्हा त्याच जागेवर तात्पुरत्या टपऱ्या उभ्या राहताना मी बघीतल्या आहेत आणि माझी खात्री आहे कि सगळीकडे असेच होत असणार. आणि ती गाडी अधिकृतपणे २ दिवसांनी मिळणार असते. मग ती मिळाल्यावर तो रीतसर परवानगी (परवानगी देणारे त्याच्या खास ओळखीचेच असतात) का काढत नाही ? सगळे राजकारण सोडून देण्याच्या गोष्टी करतो. शेवटी तो रिक्षा चालवताना दाखवला आहे. आणि त्याची बहिण एक टपरी चालवत असते. (ही टपरी तरी अधिकृत आहे का ?) या टपरीवर तो उभा असताना राडा चालू झाल्याचे कळते आणि तो काठ्या घेवून मारामारीला निघतो पण बहिणीच्या भाषणानंतर त्याचे मतपरिवर्तन होते आणि तो काठ्या घेवून भांडणे थांबवायला निघतो.

अविनाश हा साम्राज्य सेनेचा जिल्हाप्रमुख असतो. पण तसे वागताना तो कुठे दिसत नाही. राजेश सरपोतदार यांच्या सभेच्या आयोजनाच्या निमित्ताने कोल्हापुरात आदित्यच्या कंपनीतील इतर सहकारी येतात. त्यातील एका मुलीसमोर तो १-२ वाक्ये इंग्रजीतून बोलतो आणि ती प्रचंड impress होते. मग त्यांची मैत्री होते. ती त्याला राजकारणापेक्षा नोकरी चांगली कशी हे पटवून देते. पण त्या वेळी त्याचा राजकारणाचा मार्ग पक्का असतो. निवडणुकीच्या वेळी दुसऱ्याला तिकीट मिळाल्यावर हा माणूस राजकारण सोडून नोकरी धरतो आणि ६ महिन्यांत त्या मैत्रिणीचा बॉस बनतो. माझ्या माहितीत तरी एकवेळचे तिकीट मिळाले नाही म्हणून राजकारण सोडणारा माणूस नाही. आणि "माझा राजकारणाचा मार्ग पक्का आहे" वैगेरे बात करणाऱ्या तरुणाकडून हे अपेक्षित नाही.

चित्रपटातून "राजकारण वगैरे काही करू नका. ते वाईट असते. त्यापेक्षा फक्त स्वत:ची नोकरी करा" हा जो संदेश मिळतो तो चुकीचा आहे. राजकारण एवढेही वाईट नाही. आणि स्वत:चा धंदा/नोकरी सांभाळून सुद्धा राजकारण करता येतेच की !


चित्रपटातील मला विनोदी वाटलेले काही प्रसंग/संवाद -
१) " Friends ?" - अविनाशने १-२ वाक्ये इंग्रजीतून बोलल्यावर त्या मुलीने " Friends ?" असे म्हणून त्याच्यासमोर पुढे केलेला हात.
२) "जर तू पदवीधर आहेस तर तू राजकारण का करतोस ? शहरात जावून नोकरी का करत नाहीस ?" अविनाशला त्या मुलीने विचारलेला प्रश्न.
३) सभेच्या आयोजनासाठी आलेल्या मुलींपैकी एक मुलगी उन्हामुळे बेशुद्ध पडते तेंव्हा आकाशात सर्वत्र ढग दिसत असतात.
४) शेवटच्या प्रसंगामध्ये, उमेश अमेरिकेत असताना त्याच्या खिडकी बाहेर दिसणारा स्वातंत्रदेवीचा पुतळा.
५) Rock style ने काळे कपडे घालून नाचणारा, गाणारा अवधूत गुप्ते. स्वत:चा चित्रपट आहे म्हणून हे शक्य झाले असावे.

संपूर्ण चित्रपटात "विठ्ठला" हे गाणेच आवडले फक्त मला. "चालतं चालतं , चित्रपट आहे !" असे म्हणून चित्रपट पाहण्याचा खूप प्रयत्न केला पण तरीही चित्रपटात घडणाऱ्या गोष्टी पटल्या नाहीत.
8

सुर पुन्हा जुळलेच नाहीत

"मिले सुर मेरा तुम्हारा" हे गाणे माहित नसलेला अणि ते आवडत नसलेला भारतीय माणूस सापडणे विरळाच ! १९८८ साली तयार केलेले हे गाणे आपल्या सर्वांच्याच जिव्हाळाच्या विषय आहे. भारतीय परंपरा, एकात्मता यांचे सुंदर दर्शन या गाण्यातून घडते.

आणि आता २२ वर्षानंतर आरती आणि कैलाश सुरेंद्रनाथ (हो, या नावाची दोन माणसे आहेत ! ) यांनी हे गाणे "फिर मिले सुर मेरा तुम्हारा" या नावाने remix केले आहे. कालच या गाण्याचे उद्घाटन झाले. हे गाणे परत चित्रित करण्यामागचा हेतूच मला कळला नाहीये. ज्याप्रमाणे सध्याच्या संगीत क्षेत्रातील कोणतेही remix मूळ गाण्यापेक्षा वाईट असते, त्याचप्रमाणे हे नवीन गाणे पण मूळ गाण्याच्या तुलनेत फारच वाईट आहे. १६ मिनिटांच्या या गाण्यात २२ अभिनेते/अभिनेत्री, १८ संगीतकार/गायक आणि इतर १५ प्रसिद्ध व्यक्ती व्यक्ती आहेत. गाण्यातील संगीतकारांचा थोडासा चांगला भाग वगळला तर हे गाणे पूर्णपणे बॉलीवूडमय आहे. नवीन भारतच जर दाखवायचा असेल तर कितीतरी चांगले लोक आहेत आपल्याकडे. सचिन तेंडूलकर, अब्दुल कलाम, मेधा पाटकर, अरविंद केजरीवाल अशी बरीच नावे घेता येतील. करण जोहर, शामक डावर, भूपेन हजारीया, उघडे पाय दाखवणारी दीपिका पदुकोण, बनियन घातलेला सलमान खान दाखवण्याची काय गरज आहे ? फक्त बॉलीवूड म्हणजे भारत नाही.

खरे तर नवीन हे गाणे नवीन चित्रित करण्याची पण गरज नाही. जुनेच गाणे एवढे चांगले आहे की तेच पुन्हा पुन्हा दाखवले तरी आम्ही आनंदाने बघू.


जुने मिले सुर मेरा तुम्हाराफिर मिले सुर मेरा तुम्हारा - १फिर मिले सुर मेरा तुम्हारा - २

7

Random thoughts - 5

१) चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच बघायचा आहे का ? Paid Preview वगैरे विसरा. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी १ आठवडा आधी चित्रपटावर काहीतरी आक्षेप घ्या. TV channels अश्या बातम्यांच्या शोधात असतातच. मग दिग्दर्शक तुमच्याकडे स्वत: चित्रपटाची डीव्हीडी घेवून येईल. ती आरामात बघा आणि मग "उदार मनाने" दिग्दर्शकाला माफ करा.

२) मध्यंतरी पुण्याला नळाद्वारे स्वयंपाकाचा गॅस पुरवण्यात येणार असे वाचले होते. म्हणजे आता पुढच्या निवडणुकांत (म्हणजे हि योजना कार्यान्वित झाली तर) "२४ तास गॅस, पूर्ण दाबाने गॅस पुरवठा " अश्या घोषणा असणार का ? रात्री फक्त २ तास गॅस असतो म्हणून बायका रात्रीच स्वयंपाक करणार का ?

३) राजमल लखीचंद ज्वेलर्स त्यांच्या नावाचा short form "R. L." असा करतात. हे ठीक आहे. आता हे "R. L." ते मराठीत "आर. एल." असे लिहितात. हे पण ठीक आहे. पण परत या मराठीतल्या "आर. एल." चे परत इंग्रजीमध्ये "Aarel" असे रुपांतर मी बघितले आहे. हे मात्र जास्तच होतंय. आता ते या "Aar el" चे ते मराठीत रुपांतर का करत नाहीत ? असे करत बसले तर ते infinite loop मध्ये जातील.

४) काही दिवसांपूर्वीच खोटी वैद्यकीय बिले सदर केल्याबद्दल आमदारंवर कारवाई करावी असा कोर्टाने आदेश दिला. आता हे आमदार खोटी बिले सदर का करतात ? त्यांच्याकडे पैसा कमी आहे का ? का आपण सामान्यांसारखे आहोत हे कुठेतरी दाखवण्यासाठी ?

५) सेन्सॉर बोर्ड नेमके काय काम करते हा प्रश्न हल्ली मला सारखा पडू लागला आहे. सेक्स हा शब्द असलेले संवाद आणि हि क्रिया असलेली दृश्ये वगळणे एवढेच त्यांचे काम असते का ? लोकांवर वाईट परिणाम होवू नये म्हणून ते स्वत: जातीने हि सर्व दृष्ये बघतात आणि सामान्य माणसांना बघू देत नाहीत. हेच जर त्यांचे काम असेल तर सामान्य लोकांच्या भल्यासाठी हे काम करायला मी तयार आहे. :P

६) गिनीसबुकचे लोकांना एवढे आकर्षण का असते ? या आठवड्यात पुण्यात "अंतर्नाद" नावाचा कार्यक्रम झाला. तो कार्यक्रम नक्की काय आहे या बद्दल कोणीच काही बोलत नव्हते. सुमारे ३००० लोक एका मंचावरून गाणार आणि जागतिक विक्रम करणार याचीच चर्चा चालू होती.

७) "बहुत जाहले पब्लिसिटी स्टंट" असे म्हणायची वेळ आता आली आहे. बघावे त्या चित्रपटाच्या निमित्ताने, बघाव्या त्या मालिकेमध्ये काहीतरी पब्लिसिटी स्टंट चालू आहेत. या स्टंटचा माझ्या बालमनावर फारच विपरीत परिणाम झाला आहे. कोणीही काहीही केले तरी मला आता तो पब्लिसिटी स्टंटच वाटतो. गेल्या आठवड्यात सवाईला गेलो असतानाचा एक प्रसंग आहे. पंडित जसराजांचे गायन होते, गायनाच्या सुरुवातीला तबलजीचा सूर पंडितजींच्या मनासारखा लागत नव्हता म्हणून ते त्याला मधून मधून ओरडत होते. एवढी साधी घटना. पण एक क्षणभर, मला तो पब्लिसिटी स्टंटच वाटला. मला वाटले कि आता तबलजी उठेल आणि त्याच्या असंख्य चाहत्यांचा अपमान केल्याबद्दल काहीतरी बोलेल आणि तरातरा निघून जाईल. पण तसे काही झाले नाही आणि मी भानावर आलो. या पब्लिसिटी स्टंटनी तर माझी फारच वाट लावली आहे.या पासून वाचण्याचा काही उपाय आहे का ?
1

कुठे जातो तुमचा आयकर ? - २

मंत्र्यांची दालने चकाचक करण्यासाठी

२१ मंत्र्यांच्या दालनाच्या सुशोभीरणासाठी सुमारे पाच कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून काही मंत्र्यांच्या दालनातील उंची सोफे व फर्निचर मंत्रालयामागील मोकळ्या जागेत फेकून देण्यात आले आहे. यापूर्वीही मंत्र्यांच्या दालनाचे सर्वार्थाने नुतनीकरण करण्यात आले होते. मात्र नव्याने आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर बहुतेक मंत्र्यांनी आपल्या दालनाचे नुतनीकरणाचे काम हाती घेतले आहे.

राज्यावरील कर्जाचा बोजा वाढत असताना, महागाई वाढत असताना मंत्री दालनाच्या सुशोभीकरणात व्यग्र आहेत असे दिसते. सुशोभीकरण केल्यावर ते जास्त चांगल्या प्रकारे कामे करणार आहेत का ? बऱ्याच मंत्र्याची दालने चांगली असूनही वास्तुशात्राच्या, फेंगशुईच्या नियमांनुसार दालनांचे सुशोभीकरण चालू आहे असे ऐकले आहे. प्रत्येक वेळी मंत्री कार्यभार स्वीकारल्यावर एक काम सर्वप्रथम करतो ते म्हणजे दालनाचे सुशोभीकरण.

निवडणुकीच्या आधी सोनिया गांधीनी कॉंग्रेसजनांना साधी राहणी स्वीकारण्यास सांगितले होते. त्याचा बराच गाजावाजा झाला. आता निवडणूक संपल्यावर पुन्हा पहिले पाढे पंचाव्वन
8

तो राणे नव्हेच !

नारायण राणे यांनी झेंडाच्या प्रदर्शनास हिरवा कंदील दाखवल्यावर अखेरीस या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. झेंडा प्रदर्शनाच्या या घटना म्हणजे WTF story of the week होत्या.

पहिल्यांदा अवधूत गुप्ते यांनी शिवसेनेकडून आणि मनसेकडून चित्रपट प्रदर्शनाला हिरवा कंदील मिळवला.पण या गडबडीत राणेंची परवानगी राहून गेली. महाराष्ट्राच्या राजकारणात आता मोठे ठाकरे(हिंदू ह्रुदयसम्राट), राज ठाकरे(युवा ह्रुदयसम्राट) आणि नारायण राणे(कोकणाचे भाग्यविधाते(म्हणजे नक्की काय ?)) हि तीन शक्तीपीठे झाली आहेत. तिघांपैकी कोणीतरी आडवा येतोच. या वेळी राणे आले.

या चित्रपटात सदा मालवणकर नावाची मालवणी भाषेत बोलणारी व्यक्तिरेखा आहे. ती नारायण राणेंवर आधारित आहे आणि त्यामुळे तमाम कोकणवासीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत असे विधान नितेश राणे यांनी केले. कुठली कोकणी माणसे ? मी पण कोकणीच आहे. मला काही वाटले नाही. आणि माझ्या माहितीच्या कोणत्याच कोकणी माणसाला काही वाटले नाही. अर्थात आता राणे कुटुंबीय स्वत:ला "कोकणाचे भाग्यविधाते" म्हणवून घेत असल्यामुळे तमाम कोकणी जनतेच्या भावनांचे कंत्राट त्यांनी घेतले असावे . अर्थात हल्ली लोकांच्या भावना कशामुळेही दुखावतात म्हणा. अवधूत गुप्ते यांनी चित्रपट काढल्यामुळे अजूनतरी कोणाच्या भावना दुखावल्याचे ऐकिवात नाही.

मग अवधूत गुप्तेंनी एक युक्ती केली. सदा मालवणकर या व्यक्तिरेखेचे नाव सदा पानवलकर असे ठेवले. आणि त्याची बोलायची पद्धत मालवणी न ठेवता साधी ठेवली. बस ! बाकी काही नाही. आणि आता नारायण राणेंनी चित्रपट प्रदर्शनाला परवानगी दिली. नाव बदल्यामुळे लोकांना ती व्यक्तिरेखा कोण आहे हे कळणार नाही असे राणेंना वाटते का ? आता सदा मालवणकरचे नाव बदलून सदा पानवलकर ठेवले आहे हे सगळ्यांना माहित आहे. आणि ती व्यक्तिरेखा बघूनच ती राणेंवर आहेत हे लगेच समजते.

समजा या चित्रपटात सदा मालवणकरने काही कृष्णकृत्ये(खून, बलात्कार, लाच ईत्यादी) केल्यामुळे राणेंना (आणि तमाम कोकणवासीयांना ) वाईट वाटले असेल तर आता वाईट वाटण्याचे काही कारण नाही. कारण सदा मालवणकरचे नाव आता सदा पानवलकर आहे. तो राणे नव्हेच !
5

फलकचोर

पुण्यात अणि इतर सगळ्याच शहरात फ्लेक्सच्या फलकांचे लोण आता चांगलेच पसरू लागले आहे. कुठल्याही निमित्ताने लोकांना शुभेच्छा देणारे फ्लेक्स अणि त्यावरचे फोटो आता आपल्या चांगलेच परिचयाचे झाले आहेत. हे फ्लेक्स लावणारे लोक ते काढण्याचे भानगडीत मात्र पडत नाहीत. सगळेच राजकीय पक्ष यात सामील असल्यामुळे महानगरपालिकासुद्धा हे फलक हटवण्याच्या फंदात फारशी पडत नाही.

मागच्याच आठवड्यात एका वेगळ्या फलकाने माझे लक्ष वेधून घेतले. दांडेकर पूल वस्तीजवळ हा फलक लावला होता. त्या विभागातील गुंड, घरफोडे, चोर, खंडणी बहाद्दर, खुनी, पाकीटमार यांचे फोटो या फलकावर होते. त्या विभागातील पोलीस आणि सजग नागरिक मंच यांनी मिळून तो फलक लावला होता. १-२ दिवसांनंतर बघितले तर त्यातला एक फोटो नावासकट कापला होता. अजून ३-४ दिवसांत अजून २-३ फोटो कापले गेले. आणि शेवटी तो फलकच गायब झाला. त्या फलकावर ज्यांचे फोटो होते त्यांनीच तो फलक चोराला असावा.

आता एक फ्लेक्स कमी झाला म्हणून आनंद मानायचा की तो फ्लेक्स चोरीला गेला म्हणून दु:ख व्यक्त करायचे याचा विचार मी करतोय. आता जेंव्हा तिथले लोक असा फलक पुन्हा लावतील तेंव्हा या चोरांच्या फोटोसमोर फलकचोर असेसुद्धा लिहितील का ?
13

पुणेरी नजरेने पुण्यातील वाहतूक

एका पुणेकराची "पुण्यातील वाहतूक" या विषयावर घेतलेली ही मुलाखत.

१) तुम्ही कोणते वाहन चालवता ?
पुणेकर - कोणते वाहन चालवतो हे फारसे महत्वाचे नाही. पुलंनी सांगितल्याप्रमाणे पुण्यात कोणतेही वाहन चालवणे म्हणजे हत्यार चालवण्यासारखेच आहे.

२) पुण्यातील वाहतुकीची समस्या एवढी गंभीर होत आहे. पुणे आता देशातील सर्वाधिक दुचाकींचे शहर म्हणून ओळखले जाते. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते ?
पुणेकर - आम्हा पुणेकरांना प्रत्येक गोष्टीबाबत काहीतरी वेगळे वाटत असते असे तुम्हाला का वाटते ? काहीही वाटत नाही, सकाळ संध्याकाळ रस्त्यावर असताना लोकांना, सरकारला शिव्या देत जायचे आणि घरी आल्यावर सगळे विसरायचे. बास !

३) वाहतुकीच्या समस्येबद्दल पुण्याबाहेरून आलेले लोक जबाबदार आहेत असे तुम्हाला वाटते का ?
पुणेकर - आम्ही आतले, बाहेरचे असा भेदभाव करत नाही. कोण गाडी चालवत आहे, यावर आपला टोमणा ठरतो. तरुण मुलगा असेल तर, "बापाच्या पैशावर मजा मारतात साले", तरुणी/बाई असेल तर, "या बायकांना जन्मात गाडी चालवता येणार नाही.". म्हातारा(५५+) मनुष्य असेल तर, "या वयात झेपत नसताना गाडी चालवायची कशाला ?" असा शेरा तयार असतो.

४) वाहतूक सुरळीत होण्यासाठी वाहतूक विभाग निरनिराळ्या योजना आखत असते. त्याचा काही फायदा होतो असे तुम्हाला वाटते का ?
पुणेकर - वाहतूक विभागाच्या तथाकथित योजना मी फक्त वर्तमानपत्रात वाचतो. मोठा गाजावाजा करून असल्या योजना सुरु करतात. खुद्द रस्त्यावर काही दिसत नाही. चौकातील कॅमेरे चालू नसतात. रेल्वे स्थानकावर प्रीपेड रिक्षा नसतात. आपण काहीतरी योजना आखतोय असे दाखवणे हे त्यांचे काम आहे. ते करतात. करू दे.

५) महानगरपालिका वाहतुकीसाठी काही करते का ?
पुणेकर - महानगरपालिका फक्त रस्ते खोदते आणि वाहतुकीची समस्या वाढवते. सांगितलेल्या वेळेत रस्ता कधीच कसा पूर्ण होत नाही ? महानगरपालिकेने वाहतूकीबाबत केलेला सर्वात मोठा विनोद म्हणजे बी.आर.टी. असावा. या योजनेत त्यांना नक्की काय करायचे आहे, हे त्यांना तरी ठावूक आहे का ?

५) जर महानगरपालिका काही करत नाही, तर तुम्ही महानगरपालिकेतील सत्ता बदलत का नाही ?
पुणेकर - तुम्ही वाहतुकीबद्दल मुलाखत घेत आहात ना, मग वाहतुकीबद्दल बोला, उगाच राजकारणात घुसू नका.

६) वाहन चालवणाऱ्या इतर लोकांबद्दल आपल्याला काय वाटते ?
पुणेकर - ती माझ्यासारखीच माणसे आहेत. एखादा माणूस कोणते वाहन चालवतो यावर त्याच्याबद्दलचे मत ठरते. चारचाकीवाले पैशाचा माज असलेले असतात. दुचाकीवाले उगीच भाव खाणारे आणि जमेल तेथे घुसणारे असतात. रिक्षावाले अडाणी, भांडखोर असतात. पादचाऱ्यांना कसे चालावे ते समाजात नाही. पी.एम.टी. च्या वाहनचालकांद्दल तर बोलायलाच नको. वाहन चालवणाऱ्या सगळ्यांना रस्ता आपल्या बापाचाच आहे असे वाटत असते.

७) वाहतूक विभागातील पोलिसांबद्दल आपणास काय वाटते ?
पुणेकर - पोलिसांबद्दल कोण चांगले बोलतो का ? मला वाटते फक्त गृहमंत्रीच पोलिसांबद्दल चांगले बोलत असावेत. पोलीस म्हणजे पैसे खाणारे, एवढेच आम्हाला कळते.

८) वाहतुकीच्या कायद्यांबद्दल जागृती नाही म्हणून असे घडत आहे का ?
पुणेकर - पुण्यातील वाहतुकीचे कायदे हे relative असतात. तुमच्या गाडीला कोणाची धडक बसली आहे कि तुम्ही कोणाला धडकला आहात, यावर कायदे ठरतात. इथल्या वाहतुकीत सगळे relative असते. समोरच्याला पिवळा सिग्नल असतान आपण गाडी पुढे नेतो. "२ सेकंदच तर आधी निघतो आहे. त्यात एवढे काय" असे आपल्याला वाटते. समोरचा माणूस पण असाच विचार करतो आणि २ सेकंद उशिरा निघतो. हे मात्र आपल्याला चालत नाही.

९) या वाहतुकीमुळे काही फायदा होतो का ?
पुणेकर - आता घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी चांगले शोधायचे. सिग्नल पलीकडील झाडामागचा पोलीस शोधताना नजर तीक्ष्ण होते.पोलिसांनी पकडल्यावर वाटाघाटींमध्ये आपण तरबेज होतो. पोलींसमोर रडवेला चेहरा करताना अभिनयकौशल्य सुधारते. भांडण करताना जरी आपलीच चूक असली तरी भांडून वाद विवादाची तयारी होते. एफ. एम. वाल्यांना वाहतुकीवर कार्यक्रम करता येतात. असे बरेच फायदे शोधता येतील.

१० ) या नवीन वर्षात तुम्ही पुणेकरांना काही संदेश द्याल का ?
पुणेकर - काहीही करा, फक्त माझ्या गाडीखाली येवू नका. बाकी पुणेकर सुज्ञ आहेतच.

हि मुलाखत पूर्णपणे काल्पनिक आहे. हे सुज्ञ वाचकांनी ओळखले असेलच.