8

एक अविस्मरणीय प्रवास

"मी श्रीवर्धनला चाललोय ३ च्या गाडीने. काही न्यायचे आहे का ?", वैभव मला फ़ोनवर दुपारी १ वाजता विचारत होता. मला त्याच्यासोबत सुमारे ४ वर्षापूर्वी केलेला प्रवास आठवू लागला.

"मी श्रीवर्धनला चाललोय ३ च्या गाडीने. काही न्यायचे आहे का ?", १२ वीच्या सुट्टीमध्ये वैभव मला याच वेळेस विचारत होता. " मलाच ने. तसेही मी इथे काही दिवे लावत नाहीये. त्यापेक्षा तिकडे भारनियमनात काहीतरी दिवे लावतो. स्वारगेटला भेटू. जागा पकडून ठेव." असे म्हणून मी फ़ोन ठेवला आणि राज सायबर कॅफ़े मध्ये गेलो. घरी इंटरनॆट येईपर्यंत ही माझी नेहमीची सवय होती. दुपारी १२ वाजता जायचे ठरायचे मग लगेच जावून रिझर्वेशन करुन यायचे. मग १.३० ला जेवून राज मध्ये जायचे. तिकडून २.३०-३५ ला आल्यावर ५ मिनिटांमध्ये बॅग भरुन २.४५ ला स्वारगेटकडे कूच करायचे. पण आज रिझर्वेशन केले नसल्यामुळे २.३० लाच आवरुन घरुन निघालो.

स्वारगेटला जावून बघतो तर जवळपास अर्धे श्रीवर्धन गाडीमध्ये होते. वैभव आलाच होता. जागा न पकडल्याबद्दल त्याला प्रेमाचे ४ शब्द सुनावून झाले. मी गाडीत जावून श्वास घेता येतोय की नाही ते बघितले. श्वास घेण्यास त्रास नव्हता पण किती वेळ अशा गर्दीमध्ये उभे रहावे लागेल हे माहीत नव्हते. वैभवनी असा उभा राहून ४ तास प्रवास केल्यामुळे तो परत तसा येणार नव्हता. "४ ला महाड गाडी आहे. तिने माणगावला जाऊ. तिथून मग बघू " वैभवने सुचवले. आम्ही दूर उभ्या असलेल्या महाड गाडी मध्ये जावून बसलो. गाडी सुटायला वेळ असल्यामुळे ती अजून फ़लाटावर लागली नव्हती. "बस स्टॅडवर १ तास " असा मी फ़क्त निबंध वाचला होता. पण प्रत्यक्ष अनुभव घेवून तो प्रकार किती भयंकर आहे हे कळाले. वेळ जाता जात नव्हता. त्याकाळी मोबाईलाचे एवढे प्रस्थ नव्हते त्यामुळॆ त्याचाही प्रश्न नव्हता. शेवटी ४ वाजले. तरी गाडी हलत नव्हती. म्हणून बाहेर जावून बघून आलो तर फ़लाटवर दुसरीच महाड गाडी लागली होती. आणि तीसुद्धा भरत आली होती. मग काय विचारता ? कशीतरी धावत पळत जावून जागा पकडली आणि एकदाची गाडी सुटली.

पौडच्यापुढे गाडी आल्यावर समजले की तीत काहीतरी बिघाड आहे. मग ती सावकाश नेण्याचे ठरले. एवढ्यात वैभवला गाडीमध्ये एक जुने शिक्षक भेटले. ते त्याला ३ महिनेच शिकवायला होते. पण त्यावर ते दोघे गप्पा मारू लागले. ते आता जसवलीस (जसवली हे म्हसळा आणि श्रीवर्धनच्या मध्ये श्रीवर्धनपासून अंदाजे ३ किलोमीटर अंतर असलेले छोटेसे गाव आहे.) नोकरीला होते. उन्हाळ्याची सुट्टी संपवून ते आता परत जसवलीला निघाले होते. त्यांच्या गप्पा ऎकत ऎकत(?) माणगाव आले तेंव्हा ९ वाजले होते.

घरी फ़ॊन करुन मी झालेल्या प्रकाराची कल्पना दिली आणि उशिरा घरी येईन असे सांगितले. नशीबाने आम्हाला लगेच मुंबई- शेखाडी - श्रीवर्धन गाडी मिळली. ती म्हसळा- दिघी- शेखाडी या मार्गे श्रीवर्धनला रात्री १.३० च्या सुमारास पोहोचणार होती. २ तासांचा जास्त हेलपाटा पडणार होता आणि वैभवच्या सरांनासुद्धा ती उपयॊगी नव्हती कारण त्यांना श्रीवर्धनहून लगेच रिक्शा मिळाली नसती. तेंव्हा कंडक्टरने आम्हाला सांगितले की म्ह्सळ्य़ाहून १२.३० ला मिरज गाडी आहे. ती १.३० पर्यंत श्रीवर्धनला पोहोचेल. म्हणजे हिशॊब तोच होता पण सरांची सोय होणार होती. मग आम्हीपण म्ह्सळ्य़ाला उतरायचे ठरवले. गाडीमध्ये बसण्यापेक्षा तिकडे काहीतरी खावू असा विचार आम्ही केला.

तिकडे उतरल्यावर मग मात्र सरांनी मत बदलले. त्यांना त्यांच्य़ा खोलीची अवस्था माहीत नव्हती म्हणून त्यांनी तिथेच लॉजवर राहण्य़ाचे ठरवले. आणि ते निघूनही गेले. मी वैभवला परत ४ शब्द ऐकवले. भूक तर लागलीच होती. "ड्रॅगन चायनीज" नावाचे एकमेव उघडे दुकान बंद होण्याच्य़ा मार्गावर होते. तिथे जे थोडेफ़ार शिल्लक होते त्यातून काहीतरी बनवण्यास सांगितले. तयार झालेल्या पदर्थाचे नाव शेझवान राइस आहे हे दुकानदाराने सांगितल्यामुळे आम्हाला कळाले. तोपर्यंत आम्ही दोघे नुसते अंदाज करत होतो.

खावून झाल्यावर आम्ही बस स्टॉपवर येवून थांबलॊ. स्टॉपवर अजून २-३ स्थानिक तरूण गप्पा मारत होते. त्यांच्यात सामील झालॊ. तेवढ्यात तिथे एक सुस्वरुप तरुणी येवून थांबली. आणि १५-२० मिनिटांनी पोलिसांची गाडी तिथे आली आणि त्या मुलीला घेवून गेली. त्यानंतर तिथल्या मुलांनी ती मुलगी "तसली" असल्याचे सांगितले. आणि आणि गप्पा तसल्य़ा मुलींकडे वळू लागल्या. तेवढ्यात पोलीस त्या मुलीची विसरलेली बॅग नेण्यासाठी परत आले. ती घेतल्य़ावर आम्ही नवीन असल्य़ामुळे आम्हाला १-२ प्रश्न विचारले पण तिथल्या पोरांमुळे आमची लगेच सुटका झाली. [:P] थोड्या वेळाने पाऊस सुरु झाला आणि दिवेही गेले. मग अंधारातच गप्पा रंगल्या.


१ वाजल्यावर शेवटी मिरज गाडी आली. त्यात चालक - वाहकाशिवाय कोणीच नव्हते. गाडीत बसल्य़ावर मी भुतांच्या गोष्टी आठवू लागलो. गाडी शेवटी श्रीवर्धनच्या बाहेरील पेट्रोल पंपाजवळ आली. बघतो तर काय ? फ़णसाचे एक भले मोठे झाड रस्त्यावर पडले होते आणि ५ S.T. च्या गाड्या तिथे उभ्या होत्या. गाडी पुढे जाणे शक्य नव्हते. गमंत म्हणजे ज्या गाडीने आम्ही गेलो नाही तॊ शेखाडी मार्ग चालू होता. वाहकाने गाडी बाजूला लावली आणि आम्हांला जायला सांगितले. ते दोघे तिथेच झोपणार होते. १.४५ च्या सुमारास मग आम्ही घराकडे चालू लागलॊ. साधारण २ किलोमीटरचा रस्ता होता. वैभव आता वैतागला होता. वाटेवर एक रिक्शा दिसली. ती दुसरीकडे चालली होती. पण रिक्शाचालकाने आम्हांला घराच्य़ा जवळपास पोहोचवण्याचे कबूल केले. वैभवला त्याने घरी सोडले परंतु मला मला घरापासून जरा लांब सोडून तो निघून गेला. रस्त्यावर उतरलॊ आणि ५- ६ कुत्री अंगावर भुंकू लागली. तेवढ्यात पाऊस सुरू झाला. कुत्री पांगली. लगेचच दिवेही गेले. (मला असा संशय आहे की MSEB च्या सर्व कार्यालय़ात १ कर्मचारी २४ तास फ़क्त यासाठीच बसलेला असतो. जरा पावसाला सुरुवात झाली की तो लगेच दिवे घालवतो.) तसाच भिजत घरी आलो. पंखा नसताना डासांच्या सहवासात कधी झोप लागली हे कळाले नाही. जास्तीत जास्त ५.३० तासांच्या प्रवासाला तब्बल १२ तास लागलॆ होते. पण सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे मी माझ्या घरी होतो. "याचसाठी केला होता अट्टाहास" अशी माझी स्थिती झाली होती.

एवढे सगळे रामायण मला १ सेकंदामध्ये आठवले. मी उत्तरलो " मलाच ने. स्वारगेटला भेटू "